40 लाखांपर्यंत उलाढाल असलेल्या व्यावसायिकांना हॉलमार्क सक्तीतून वगळले

सागर कायगावकर : 20, 23, 24 कॅरेट सोने हॉलमार्क प्रमाणित करण्याची मागणीही मान्य
40 लाखांपर्यंत उलाढाल असलेल्या व्यावसायिकांना हॉलमार्क सक्तीतून वगळले
संग्रहित

अहमदनगर (प्रतिनिधी) - सोने विक्री करताना आता सुवर्ण व्यावसायिकांना हॉलमार्क बंधनकारक करण्यात आले आहे. 16 जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. दरम्यान, या निर्णयासंबधी जेम्स ज्वेलरी कौन्सिल, आयबीजेएसह विविध सुवर्णकार संघटनांसमवेत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी बैठक घेतली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय होऊन सुवर्ण व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. 40 लाखांपेक्षा कमी वार्षिक उलाढाल असलेल्या व्यावसायिकांना हॉलमार्क सक्ती लागू राहणार नाही.

तसेच 20, 23, 24 कॅरेट सोनं हॉलमार्क प्रमाणित करण्याची सुवर्ण व्यावसायिकांची मागणीही मान्य झाली आहे, अशी माहिती इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे (आयबीजेए) सहसंचालक सागर कायगांवकर यांनी दिली. कायगांवकर यांनी सांगितले, हॉलमार्क सक्ती संदर्भात केंद्रीय मंत्री गोयल यांच्या समवेत झालेल्या बैठकीत असोसिएशनचे राष्ट्रीय सेक्रेटरी सुरेंद्र मेहता सहभागी झाले होते. हॉलमार्क सक्ती टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 16 जूनपासून देशातील 741 पैकी 256 जिल्ह्यात जिथे किमान एक हॉलमार्किग सेंटर आहे, तिथे सक्ती लागू होईल. हॉलमार्कसाठी केवळ एकदाच आणि मोफत नोंदणी करता येणार आहे. नोंदणी नूतनीकरण आवश्यक नसेल. सोन्यांची घड्याळ, पेन, कुंदन, पोलकी, जडाऊ या दागिन्यांसाठी हॉलमार्क सक्ती नसेल.

आंतरराष्ट्रीय तसेच देशातील सरकारमान्य प्रदर्शनात मांडण्यात येणारी ज्वेलरीलाही हॉलमार्कचे बंधन नसेल. हॉलमार्क संबंधी 31 ऑगस्ट 2021 पर्यंत कोणत्याही यंत्रणेला दुकाने तपासणी, दंडात्मक कारवाई, माल गोठवणे अशी कारवाई करता येणार नाही. सुवर्ण व्यावसायिकांना ग्राहकांकडील जुनं सोनं हॉलमार्क शिवाय घेण्याची मुभा असणार आहे. हॉलमार्क योजना अंमलबजावणी दरम्यान येणार्‍या अडचणी सोडवण्यासाठी सर्व संबंधित घटकांची संयुक्त समिती अस्तित्वात येणार आहे. या समितीमार्फत विविध अडचणींचे निराकरण करण्यात येणार आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलनुसार भारतात 4 लाखांहून अधिक सुवर्ण व्यावसायिक असले तरी बीआयएसकडे फक्त 35 हजार 879 व्यावसायिक प्रमाणीत आहे. हॉलमार्क सक्ती संपूर्ण देशभरात लवकरच लागू होणार आहे. त्यामुळे सर्वच सुवर्ण व्यावसायिकांना नोंदणी करावीच लागेल. यासाठी आवश्यक तयारी करून सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे बनले आहे, असं कायगांवकर यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com