पाणी योग्य जागी अडविण्या-जिरविण्यासाठी भूविज्ञानाचा अभ्यास महत्वाचा

भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. वडगबाळकर यांचे प्रतिपादन
पाणी योग्य जागी अडविण्या-जिरविण्यासाठी भूविज्ञानाचा अभ्यास महत्वाचा
संग्रहित

नेवासा (तालुका प्रतिनिधी) - महाराष्ट्रात पडणार्‍या पावसाचा विचार करता आपल्याकडे पाणी योग्य जागी मुरवणे-जिरवणे व पाणी साठवणे या दोन तंत्राची खूप जरुरी आहे. पाणी जिरविण्याला मर्यादा असल्याने पाणी साठवून त्याची गुणवत्ता राखणे जरुरीचे आहे. पाणी योग्य जागी अडविणे व जिरविण्यासाठी भूविज्ञानाचा अभ्यास महत्वाचा असल्याचे मत भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. श्रीनिवास वडगबाळकर यांनी मांडले.

महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, जलसाक्षरता केंद्र, यशदा व युनिसेफ यांचे संयुक्त विद्यमाने बुधवार दि.23 जून रोजी आयोजित केलेल्या ‘आओ भूजल जाने’ या शृंखलेतील 23 व्या वेबिनार मध्ये महाराष्ट्रातील भूजल विज्ञान आणि जलसाक्षरता या विषयावरील परिसंवादा प्रसंगी ते बोलत होते.

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जलप्रेमी सुखदेव फुलारी, यशवंत लोणकर, नगर भूजल कार्यालयाच्या रश्मी कदम, भजनदास पवार, सचिन सूर्यवंशी, उपेंद्र धोंडे, वर्षा माने आदी सहभागी होते.

डॉ. वडगबाळकर पुढे म्हणाले, महाराष्ट्रात पडणार्‍या पावसाचा विचार करता आपल्याकडे पाणी योग्य जागी मुरवणे-जिरवणे व पाणी साठवणे या दोन तंत्राची खूप जरुरी आहे. उपलब्ध पाणीसाठा जमिनीत योग्य पद्धतीने मुरण्यासाठी पाणलोट क्षेत्रांची भूस्तरीय रचना कोठे आणि किती अनुकूल आहे याची तपशीलवार क्षेत्रीय पाहणी करायला हवी आणि तशा योजना तयार कराव्या लागतील. विभागनिहाय बदलणारी भौगोलिक रचना , पायाभूत रचनेचा सखोल अभ्यास महत्त्वाचा आहे. वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये पाणी आणि जमिनीच्या व्यवस्थापनाचे वेगवेगळे आकृतिबंध स्वीकारावे लागतील.

जास्तीत जास्त गाळ खडकांमध्ये वाळू, गोटे, वाळू, गोटे, मुरूम, भेगाळलेले खडक आणि जाडसर माती व संधीयुक्त खडक यांच्यातच पाणी मुरते आणि काही प्रमाणात प्रवाहित होते. हे पृष्ठभागांपाशी मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामुळे दरवर्षी विहिरींना पाणी मिळते. विहिरी घेणे योग्य असून बोअर घेणे योग्य नाही. विहिरींना कमीतकमी हंगामी पाणी तरी मिळू शकते. बोअरला खोलीवर मिळणारे पाणी हे त्याठिकाणी शेकडो ते हजारो वर्षात थेंबे थेंबे जमा झालेले असते. आणि त्याचे पुनर्भरण लगेच होत नाही.

जमिनीत जिरविलेल्या पाण्याचा फायदा असा की, भूगर्भातील पाण्याचे बाष्पीभवन होत नाही. पण त्याचबरोबर साठवलेल्या भूजलाचा मर्यादित वापर होणे जरुरी आहे. पण सध्यातरी यावर काही नियंत्रण नाही

भूजल आणि भूपृष्ठ पाणी एकच झाल्यास पाणथळ जागा होतील. शेतजमिनी क्षारपड होतील म्हणून अतिरेक टाळा, भूजल विज्ञान जाणून घेऊन समतोल साधावा.या कामात शासनाने व जनतेने यशदाच्या जलसाक्षरता केंद्राने प्रशिक्षित केलेल्या जलयोद्धे, जलनायक, जलप्रेमी, जलदूत, जलसेवक यांचा उपयोग करून घ्यावा असे आवाहनही डॉ.वडगबाळकर यांनी केले.

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले,भूजल पुनर्भरण, जलसाक्षरतेची माहिती-कार्यक्रम लोकांच्या पर्यंत नेली पाहिजे. त्यांना कार्यक्रमात सहभागी करून घेतले पाहिजे. घरात, गावात, शेतात पाणी बचत कशी करायची, विहीर-बोअर पुनर्भरण कसे करायचे याची तांत्रिक माहिती दिली पाहिजे. पाण्याचा एक एक थेंब महत्वाचा आहे हा संदेश सर्वांपर्यंत गेला पाहिजे. लोकसहभाग असलेल्या कामाला दर्जा आणि शाश्‍वतता असते. भूजल विभागचे बालाजी व्हरकट यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com