तिसगावमध्ये अनधिकृत बांधकामे सुरूच

तिसगावमध्ये अनधिकृत बांधकामे सुरूच

करंजी |प्रतिनिधी|Karanji

मोठ्या बाजारपेठेचे गाव म्हणून ओळखल्या जाणार्‍या तिसगाव येथे शासकीय जागेवर अतिक्रमण करून पक्के बांधकाम करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनधिकृत बांधकाम करणार्‍यांना ग्रामपंचायतीकडून रीतसर नोटीस पाठवून बांधकाम थांबवण्याच्या सूचना देखील केल्या जात आहेत मात्र अनधिकृत बांधकामे करणार्‍यांकडून ग्रामपंचायतीच्या नोटिशीला केराची टोपली दाखवली जात आहे.

नगर रोडवर शासकीय जागेत अनधिकृतपणे पक्के बांधकाम एका व्यक्तीकडून सध्या सुरू असून या अनधिकृत बांधकामासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते सतीश साळवे यांनी ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रार केली आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीने देखील शासकीय जागेत अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले जात असल्याची खातरजमा करून घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीला लेखी स्वरूपात नोटीस पाठवून शासकीय जागेत सुरू केलेले अनधिकृत पक्के बांधकाम तात्काळ बंद करण्यात यावे अन्यथा फौजदारी स्वरूपाची कारवाई करणार असल्याचा इशारा लेखी नोटिशीद्वारे दिला आहे. ग्रामपंचायतीने नोटिसा पाठवल्या मात्र अद्याप ठोस कारवाई कोणावरही न झाल्यामुळे ग्रामपंचायतीच्या नोटिशीला अनधिकृत बांधकाम करणार्‍यांकडून केराची टोपली दाखवली जात आहे.

ग्रामपंचायतीने नोटीस पाठवूनही बांधकाम बंद न केल्यास या अनधिकृत बांधकामांविरोधात आपण ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहोत, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सतीश साळवे यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com