तिसगावला सरपंच बदलाच्या हालचाली

1 वर्षासाठी मुस्लीम समाजाला संधी देण्याचा मानस
तिसगावला सरपंच बदलाच्या हालचाली

तिसगाव |वार्ताहर| Tisgav

तालुक्यातील राजकीयदृष्ट्या व मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या तिसगावमध्ये सरपंच बदलाचे वारे वाहू लागले आहे. अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील मुस्लिम समाजाला सरपंच पदाची संधी देण्याच्या हेतूने विद्यमान सरपंचांनी पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्याने तिसगावच्या सरपंचपदाची खुर्ची मुस्लिम समाजातील सहा सदस्यांपैकी कोणत्या सदस्याला मिळणार याबाबत गावात चर्चा सुरू झाली आहे.

10 डिसेंबर 2021 ला तिसगाव ग्रामपंचायतमधे निवडून आलेल्या सदस्यांना चार वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने सत्ताधारी व विरोधी गटाच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांना सरपंच काशिनाथ पाटील लवांडे यांनी नगर येथे बड्या हॉटेलमध्ये जेवणावळीची पार्टी दिली. त्याच ठिकाणी लवांडे पाटील यांनी मुस्लिम समाजाला सरपंच पदाची संधी मिळावी, म्हणून मी राजीनामा देण्यास तयार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. 70 वर्षांपासून तिसगावच्या सरपंच पदावर काम करण्याची संधी एकदाही मुस्लीम समाजाला मिळालेले नाही, म्हणून सरपंच लवांडे यांनी वर्षभरासाठी का होईना मुस्लिम समाजाचा सरपंच व्हावा, या हेतूने सरपंच पदाच्या खुर्चीवरुन बाजूला होण्याची भूमिका घेतली.

तिसगाव ग्रामपंचायतमध्ये मुस्लिम समाजाचे सत्ताधारी व विरोधी गटाकडून सहा सदस्य निवडून आलेले आहेत. त्यांना आतापर्यंत उपसरपंच पदावरच समाधान मानावे लागलेले आहे. विद्यमान उपसरपंच इलियास शेख, तसिरखाँ पठाण, अर्षद शेख, शबाना पठाण, लालबी पठाण, शाहीदा तांबोळी हे मुस्लीम समाजाचे सदस्य आहेत. या सहा सदस्यांनी एकत्रित बसून सरपंच पदासाठी एक नाव फायनल करण्याची राजकीय खेळ देखील अगदी पद्धतशीरपणे खेळली गेल्याचे यानिमित्ताने दिसून आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com