
तिसगाव |वार्ताहर| Tisgav
तिसगाव अवैध धंद्याचे केंद्रबिंदू म्हणून ओळखू लागले असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात मटका चक्री जुगार खुलेआम सुरू आहे. ऑनलाइन चक्रीच्या खेळामध्ये परिसरातील तरुणांचे दररोज लाखो रुपये वाया जात आहेत. मटक्याचे मुख्य नेटवर्क म्हणून तिसगावची ओळख निर्माण झाली आहे. वृद्धेश्वर चौकात मटक्याच्या खुलेआम टपर्या सुरू आहेत. जुगारही ठिकठिकाणी सुरू आहे. मात्र, पोलीस हे अवैध धंदे बंद करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप सतीश साळवे यांनी केला आहे.
तिसगाव व्यापारी बाजारपेठेचे मोठे गाव म्हणून ओळखले जात असतानाच आता तिसगाव अवैध धंद्याचे केंद्रबिंदू म्हणून देखील ओळखू लागले आहे. तिसगाव येथे आजूबाजूच्या तालुक्यातून लोक ऑनलाईन चक्री मटका खेळण्यासाठी दररोज येथे येतात. येथील अवैध धंदे करणार्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांशी देखील हितसंबंध असून त्यांना नेहमी पाठीशी घालण्याचे काम याच अवैध धंद्यावल्याकडून केले जात आहे. काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांच्या तक्रारीवरून गावच्या सरपंचांना अवैधधंदे बंद करण्यासाठी उपोषणाला बसण्याची वेळ आली होती.
सरपंच उपोषणाला बसल्यानंतर पुढील काही दिवस सर्व अवैध धंदे बंद झाले. त्यानंतर पुन्हा एकदा सुरू झाले. अवैध धंदे बंद करण्याबाबत आम्ही पोलीस अधिकार्यांकडे अनेकवेळा लेखी तक्रारी केल्या. मात्र काही दिवसांनंतर पुन्हा हे सर्व अवैध धंदेे सुरू होतात. पोलीस प्रशासनाने ठरवलं तर सर्व अवैध धंदे एका दिवसात बंद होऊ शकतात. मात्र, त्यासाठी त्यांची मानसिकता असणे गरजेचे आहे. किती दिवस तक्रारी करायच्या असा सवाल बाळासाहेब गारुडकर यांनी उपस्थित केला आहे.