
तिसगाव |प्रतिनिधी| Tisgav
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील पाथर्डी रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाच्या पाठीमागे तुरीच्या पिकामध्ये मृत महिलेचे अवशेष आढळून आले आहेत. अवशेषांजवळ बिबट्याच्या पायाचे ठसे आढळल्याने महिलेला बिबट्याने ठार केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. परंतु हा घातपातही असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
घटनास्थळी सांगाड्याची कवटी व शरीराच्या हाडांसह बांगड्या साडी तिसगाव येथील एका व्यक्तीच्या निदर्शनास येताच त्याने तात्काळ पाथर्डी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यासह संपूर्ण पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. उपस्थित पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी येऊन मृत सांगाड्याचे कवटीसह साडी बांगड्या व डोक्याचे लांबलचक केस दिसून आल्यानंतर शरीराचे अवशेष हे एखाद्या महिलेचेच असावेत या निष्कर्षापर्यंत पोलीस अधिकारी पोहोचले आहेत.
या मृत सांगाड्यासह घटनास्थळाची सखोल पाहणी करत असताना पोलीस अधिकार्यांना याठिकाणी बिबट्याचे एक-दोन ठिकाणी ठसे देखील दिसून आले. त्यामुळे बिबट्यासारख्या हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात महिलेचा जीव गेला आहे की काही घातपात आहे. याबाबतचा देखील तपास पोलिसांकडून होणार आहे. तिसगाव येथे मृत व्यक्तीची कवटी आढळल्याची माहिती वार्यासारखी तिसगाव सह परिसरात समजताच बघ्यांची मात्र या ठिकाणी मोठी दिवसभर गर्दी होती.