तिसगाव बनले अवैध धंद्यांचे केंद्रबिंदू

पोलिस सहेतूक दुर्लक्ष करत असल्याचे आरोप
तिसगाव बनले अवैध धंद्यांचे केंद्रबिंदू

तिसगाव |प्रतिनिधी| Tisgav

पाथर्डी तालुक्यातील एक मोठी व्यापारी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणार्‍या तिसगावची ओळख आता अवैध धंदयाचे केंद्रबिंदू म्हणून देखील होवू लागली आहे. गावामध्ये पोलिसांच्या आशीर्वादाने मटका जुगारीसह बिंगो ऑनलाइन चक्रीचा खेळ देखील अगदी राजरोसपणे चौकाचौकात सुरू असून दररोज लाखो रुपयांची उलाढाल या चक्रीच्या खेळातून होत असून तरुणवर्ग या चक्रीच्या विळख्यात चांगलाच गुरफटत चालला आहे.

या ऑनलाइन गेममध्ये काही तासात लाखो रुपये खर्च होत असल्याने गेम खेळण्यासाठी घेतलेले उसने पैसे परत करण्यासाठी जमीन, प्लॉट, स्वतःकडील मोटरसायकल, फोरव्हीलर विकण्याची वेळ काही तरूणांवर आली आहे. हा चक्रीचा खेळ वृद्धेश्वर चौकासह बसस्थानक चौकात देखील खुलेआमपणे सुरू आहे. यासाठी इतर अवैध धंदेच्या तुलनेत तीन पट हप्ता द्यावा लागत असल्याचे अवैध धंदे करणाराकडून बोलले जात आहे. तिसगाव येथे चक्री बरोबरच मटक्याचे देखील मोठे रॅकेट आहे.

जुगार देखील या गावात ठिकाणी खुलेआम सुरू आहे. अवैध धंदे वाल्यांचे पोलिसांची आर्थिक संबंध असल्यामुळे गावातील अनेक छोटे-मोठे किरकोळ वाद, विवादही या अवैध धंदेवाल्याच्या मार्फतच मिटवले जातात. या खेळामुळे अनेक तरुण आता आर्थिक संकटात सापडले आहेत.

तक्रार केल्यास त्रास

चक्रीसह सर्वच अवैध धंदयाबाबत ग्रामस्थांमधून पोलीसांकडे तक्रार केली तर काही वेळातच तक्रारदाराचे नाव अवैध धंदे वाल्यांना समजते त्यानंतर तक्रारदाराला शाररिक तसेच मानसिक त्रास देखील देण्याचे काम होते. त्यामुळे याबाबत अनेकांनी थेट माध्यमांशी संपर्क साधून व्यथा मांडल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com