
करंजी |प्रतिनिधी| Karanji
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील ग्रामसेवक रवीकुमार देशमुख यांच्याबाबत गंभीर तक्रारी झाल्यानंतर तसेच आमदार तनपुरे यांनी सूचना देऊनही दुर्लक्ष करण्यात आल्यानंतर तिसगाव ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांनी आज पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. याची दखल घेत अखेर गटविकास अधिकार्यांनी त्यांची बदली केली.
गटविकास अधिकारी डॉक्टर जगदीश पालवे यांनी दुपारनंतर या उपोषणकर्त्यांना देशमुख यांची इतरत्र बदली करून त्यांच्या जागी संजय घुगे यांची नियुक्ती करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. घुगे यांच्या माध्यमातून आता तिसगाव ग्रामपंचायतीसाठी पूर्णवेळ देणार्या ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात आली आहे. करंजी याठिकाणी देखील देशमुख यांच्या तक्रारी वाढल्या होत्या. नेहमी ग्रामपंचायत कार्यालयात गैरहजर राहणे, कार्यालयात आलेल्या सर्वसामान्य लोकांना व सदस्यांना उडवाउडवीची उत्तरे देणे, नागरिकांशी उर्मटपणे वागणे यामुळे तिसगावकरांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे या ग्रामसेवकाची तात्काळ इतरत्र बदली करण्यात यावी ही प्रमुख मागणी अनेक दिवसांपासून ग्रामस्थ करत आहेत.
तिसगावच्या पाण्याच्या टाकीत विषारी द्रव टकाल्याच्या प्रकारानंतर आमदार तनपुरे यांनी याबाबत गटविकास अधिकार्यांना ग्रामसेवकाची तात्काळ बदली करण्याच्या सूचना केल्या होत्या परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर ग्रामसेवकाच्या बदलीसाठी नागरिकांना उपोषणाचे हत्यार उपासावे लागले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नासिरभाई शेख, तालुका दूध संघाचे संचालक बाळासाहेब लवांडे, विक्रमराव ससाणे, राष्ट्रवादीच्या महिला तालुका उपाध्यक्ष शबाना शेख, काँग्रेसचे नेते पापाभाई तांबोळी, ग्रामपंचायत सदस्य लतीफ शेख, बिस्मिल्ला पठाण, अमोल गारुडकर, पंकज मगर, डॉ.काशिनाथ ससाणे यांच्यासह अनेक तिसगावचे ग्रामस्थ उपोषणास बसले होते.