तिसगावातील ‘त्या’ मुलीच्या मृत्यूप्रकरणी अकस्मात नोंद

तिसगावातील ‘त्या’ मुलीच्या मृत्यूप्रकरणी अकस्मात नोंद

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तिसगाव येथील अल्पवयीन मुलीच्या संशयीत मृत्यूप्रकरणी पाथर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. हवालदार आप्पासाहेब वैद्य यांनी याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आता या घटनेच्या तपासाला अधिक गती होणार आहे.

दरम्यान आपचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड यांनी अल्पवयीन मुलीच्या चारित्र्याच्या संशयावरून जीवे ठार मारून मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावून पुरावे नष्ट केल्याबाबत तक्रार करत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी सुर्दशन मुंडे यांनी मंगळवारी तिसगाव येथे भेट देऊन मयत मुलीच्या आई, वडिलांसह कुटुंबातील पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यामध्ये मुलीवर उपचार करणार्‍या डॉक्टराचाही समावेश होता. बुधवारी दिवसभर चौकशी सुरू होती.

हा प्रकार माध्यमासमोर आल्याने पोलीस दल खडबडून जागा झाला. सरकारी पक्षाच्या हवालदार वैद्य यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, जालिंदर पंढरीनाथ गारुडकर (रा.तिसगाव) यांच्या अल्पवयीन मुलीस 15 जून 2021 रोजी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तिस पाथर्डी येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखवण्यात आले. त्यांनतर पुन्हा तिसगाव येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये स्वॅबची चाचणी केली. ती निगेटिव्ह आली.

दुसर्‍या दिवशी दि. 16 जून रोजी खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार करून मुलीस घरी आणले. त्यादिवशी रात्री पुन्हा त्रास होऊ लागल्याने डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या व औषधे दिल्यांनतर मुलगी आपल्या खोलीत जाऊन झोपली. दि. 17 च्या पहाटे मयत मुलीचे वडील मुलीला उठवण्यास गेले. तिने काहीच हालचाल केली नाही. त्यानंतर घरातील सर्वांना बोलावून मुलीचे शरीर थंड पडले असून मुलगी मयत झाल्याबाबत गावातील नातेवाईकांना फोनवरून कळवण्यात आले. सकाळी नातेवाईक आणि गावातील लोकांच्या उपस्थितीत तिसगावतील मांडवे रस्त्यावरील त्यांच्या मालकीच्या शेतात मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले, अशी तपासात माहिती मिळाली आहे.

या मुलीचा तिसगाव येथे अकस्मातपणे मृत्यू झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. मृत्यू बाबत मुलीच्या वडिलांनी डॉक्टर, पोलीस किंवा कुठल्याही शासकीय यंत्रणेला कळवले नाही. तिच्या प्रेतावर परस्पर अंत्यसंस्कार केले. मयत मुलीच्या उपचाराबाबत वैद्यकीय कागद पत्राची मागणी केली असता उपचाराबाबत घरातील व्यक्तींनी कोणतेही कागद पत्रे सादर केले नाही. त्यामुळे सादर मुलीच्या मृत्यूबाबत अधिक चौकशी होऊन योग्यती कायदेशीर कारवाई व्हावी, यासाठी सरकारतर्फे अकस्मात मृत्यूची खबर मी देत असल्याचे हवालदार वैद्य यांनी फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कौशलराम निरंजन वाघ करत आहे.

या घटनेबाबत सध्या चौकशी सुरू असून नातेवाईक व अंत्यसंस्कारास उपस्थितीत असलेल्या 20 ते 25 जणांची चौकशी करून जबाब घेतले जाणार आहेत. चौकशीत जो निष्कर्ष निघेल त्यानुसार पुढील कायदेशी कारवाई व गुन्हे दाखल दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.

Related Stories

No stories found.