
तिसगाव |वार्ताहर| Tisgav
पाथर्डी तालुक्यात अवैध धंद्याचे केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणार्या तिसगाव येथे पुन्हा एकदा चक्री मटका, जुगार, अवैध दारू विक्री खुलेआम सुरू झाला आहे. या सर्व अवैध धंद्याकडे पोलिसांचे मात्र पद्धतशीरपणे दुर्लक्ष होत असल्यामुळे पुन्हा एकदा सर्व अवैध धंदे फोफावल्याचे दिसत आहे.
तिसगाव व्यापारी बाजारपेठेचे मोठे गाव म्हणून ओळखले जात असतानाच आता तिसगाव अवैध धंद्याचे केंद्रबिंदू म्हणून देखील ओळखू लागले आहे. अवैध धंदे करणार्यांचे पोलिसांशी देखील अर्थपूर्ण संबंध असल्यामुळे प्रत्येकवेळी तक्रारीनंतर एखादी कारवाई दाखवून वेळ मारून नेण्याचे काम होत आहे. तिसगाव येथे आजूबाजूच्या शेवगाव, आष्टी तालुक्यातून लोक ऑनलाईन चक्री मटका खेळण्यासाठी दररोज येथे येतात. अनेकवेळा याठिकाणी बाहेर गावच्या लोकांना धामधूम करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काम होते.
येथील अवैध धंदे करणार्याचे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांशी देखील हितसंबंध असून त्यांना नेहमी पाठीशी घालण्याचे काम या अवैध धंद्यावाल्यांकडून केले जात आहे. काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांच्या तक्रारीवरून गावच्या सरपंचांना अवैध धंदे बंद करण्यासाठी उपोषणाला बसण्याची वेळ आली होती. सरपंच उपोषणाला बसल्यानंतर महिनाभर अवैध धंदे बंद झाले होते. त्यानंतर सेवा संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच पुन्हा एकदा हे सर्व अवैध धंदे हळूहळू सोयिस्करपणे सुरू झाले. वृद्धेश्वर चौक, शेवगाव चौक, मिरीरोड, नगररोड या सर्व ठिकाणी ऑनलाईन चक्री मटका, अवैध दारू विक्री अगदी खुलेआम सुरू झाले आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी तक्रारीनंतरच पोलीस थातूरमातूरपणे या अवैध धंद्यावाल्यावर कारवाई करून वेळ मारून नेतात.
अवैध धंदे बंद करण्याबाबत स्थानिक नागरिकांनी पोलीस अधिकार्यांकडे तक्रार केली तर संबंधित तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी दिली जाते.यावरून अवैध धंदे करणार्यांचे धाडस वढल्याचे दिसून येते. तिसगाव येथील सर्व अवैध धंदे बंद झालेच पाहिजे, अशी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे लेखी तक्रारीद्वारे मागणी आहे.
- सचिन साळवे, ग्रामस्थ.