तिसगावला नुकसान भरपाईपासून अनेक शेतकरी वंचित

तलाठी कार्यालयात वशीलेबाजीचे शेतकर्‍यांचे आरोप
तिसगावला नुकसान भरपाईपासून अनेक शेतकरी वंचित

तिसगाव |प्रतिनिधी| Tisgav

पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे 30 ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे ज्या शेतकर्‍यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यापैकी अनेक शेतकरी या नुकसान भरपाई पासून अद्यापही वंचित राहिले असून तलाठी कार्यालयात वशीलेबाजी होत असल्याचा गंभीर आरोप तिसगावच्या काही शेतकर्‍यांनी तहसीलदारांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, तिसगाव येथील ज्या शेतकर्‍यांच्या पिकांचे मुसळधार पावसामुळे नुकसान झाले त्यापैकी काही शेतकर्‍यांना नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून काही दिवसांपूर्वीच आर्थिक मदत मिळाली असून त्यांच्या खात्यावर पैसे देखील वर्ग करण्यात आले आहेत. परंतु अनेक शेतकरी या मदतीपासून वंचित राहिले आहेत. त्यांच्या खात्यावर पैसे जमा न झाल्यामुळे व नुकसानग्रस्तांच्या यादीत त्यांचे नाव न आल्यामुळे या शेतकर्‍यांनी थेट तलाठी कार्यालयातील तलाठ्यावरच गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.

जवळच्या लोकांना नुकसानीची भरपाई मिळवून दिली. मात्र इतर शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडल्याचे त्यात म्हटले आहे. तलाठी कार्यालयात खाजगी काम करणार्‍या झिरो तलाठ्यावर कारवाई करावी व जे शेतकरी नुकसानीपासून वंचित राहिले आहेत त्यांना शासनाकडून तात्काळ मदत मिळावी या प्रमुख मागणीसाठी 29 नोव्हेंबर रोजी तिसगाव तलाठी कार्यालयासमोर वंचित शेतकर्‍यांनी उपोषणास बसण्याचा इशारा सर्जेराव पाथरे, विक्रम लवांडे, विठ्ठल वाघ, अनिल वाघमारे, सतीश साळवे, विजय पाथरे, अजय शिंदे, अशोक गारुडकर, काकासाहेब शिंदे, अशोक भोसले, गणेश लवांडे, संगीता भोसले, जावेद सय्यद, जब्बार शेख, दत्तात्रय नाईक, सागर लवांडे,बाबासाहेब इंगळे, देवदान वाघमारे, पोपटराव भोसले, बाळकृष्ण नाईक, अमजद सरदार यांनी दिला आहे.

तलाठी कार्यालयातील कामगारांच्या जवळच्या लोकांनाच नुकसान भरपाई मिळाली असल्याचे जाहीर झालेल्या यादीवरून दिसत आहे. अनेक नुकसानग्रस्त शेतकरी यादीतून बाद झाले आहेत.

- संगीता भोसले, नुकसानग्रस्त महिला शेतकरी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com