मुबलक पाणी असूनही महिनाभरापासून तिसगाव तहानलेले

मुबलक पाणी असूनही महिनाभरापासून तिसगाव तहानलेले
पाणी

तिसगाव (प्रतिनिधी)

अतिवृष्टीनंतर गेली महिनाभरापासून मिरी तिसगाव प्रादेशिक नळ योजनेचे पाणी बंद झालेले आहे व तिसगावचे पाझर तलाव बंधारे पाण्याने तुडूंब भरले आहेत मात्र तरीही तिसगाव परिसर तहानलेला असल्याचे चित्र आहे.

तिसगावच्या सार्वजनिक विहिरीतही गाळ मिश्रीत पाणी आल्याने गेल्या वीस बावीस दिवसांपासून तिसगाव ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी मिळाले नसल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार लोखंडे यांनी केला आहे. त्यामुळे तिसगावकरांचे पिण्याच्या पाण्यासाठी अतिशय हाल होत असल्याचे त्यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणात पाऊस झाला पण त्यामुळे कोणत्याही विहिरींचे पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही.

त्याचबरोबर २८ गावाच्या नळ योजनेची वीज जोड तुटल्यामुळे गेल्या वीस बावीस दिवसांपासून नळाचे पाणी बंद झाले आहे आणि सणासुदीच्या काळात पाणी बंद झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. तरी वीज पुरवठा सुरळीत करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा. त्वरित पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा पत्रकाद्वारे तिसगाव ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार लोखंडे, शिवसेनेना शहर अध्यक्ष शरद शेंदुरकर, युवानेते प्रसाद देशमुख, संजय फिरोदिया, किरण गारुडकर, राज तांबोळी, कल्याण लवांडे यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com