तिसगाव : करोना तपासणीच्या अटीमुळे लसीकरणाची गर्दी ओसली

तिसगावमध्ये लसीकरणापूर्वी आढळले पाच पॉझिटिव्ह
तिसगाव : करोना तपासणीच्या अटीमुळे लसीकरणाची गर्दी  ओसली

करंजी (वार्ताहर) - जास्तीत जास्त करोना तपासण्या करून बाधित रूग्ण शोधण्याची मोहीम आरोग्य विभागाने हाती घेतली आहे. करोना प्रतिबंधात्मक लस घेण्यापूर्वी प्रत्येक नागरिकाची करोना तपासणी केल्यानंतरच लस दिली जात असल्यामुळे लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी आता ओसरतांना दिसत आहे.

पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवारी पहिला डोस घेणार्‍यांसाठी 80 डोस आले होते. उपस्थित 80 लोकांपैकी पाच जणांना करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्याठिकाणी लस घेण्यासाठी आलेले इतर नागरिक चांगलेच गडबडून गेले. करोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेण्यापूर्वी प्रत्येक नागरिकाने करोना चाचणीकरणे आरोग्य विभागाने बंधनकारक केल्याने आरोग्य केंद्रात पूर्वीप्रमाणे लस घेण्यासाठी होणारी गर्दी आता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

अनेकांनी या करोना चाचणीचा चांगलाच धसका घेतला आहे. कोरोना चाचणी होणार असेल तर लसच नको रे बाबा असे म्हणण्याची वेळ काहींवर आली आहे. त्यामुळे आता पूर्वीप्रमाणे लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी ओसरली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

लस घेण्याअगोदर करोना चाचणी करणे हा वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आलेला निर्णय योग्य असून बाधित लोक जर गर्दीत उभे राहिले तर त्याची बाधा इतर लोकांनाही होऊ शकते. त्यामुळे हा निर्णय योग्यच आहे.

- डॉ. बाबासाहेब होडशिळ, आरोग्य अधिकारी, तिसगाव.

लस घेण्या अगोदर करोना चाचणी करणे हा निर्णय तिसगाव केंद्राचा नसून केंद्र व राज्य सरकारचा आहे. बगल बच्च्यांना लस देण्यासाठी काही पुढारी आरोग्य विभागावर दबाव आणण्याचा प्रयत्न होते. मात्र, यापुढे कोणाचीही येथे अरेरावी खपून घेणार नाही.

- पद्माकर पाथरे, माजी सैनिक तिसगाव.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com