
तिसगाव |वार्ताहर| Tisgav
तालुक्यातील तिसगाव येथील एका मटका चालकाने एका माध्यमिक शिक्षकाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. तिसगाव येथील सचिन साळवे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले आहे. यात म्हटले आहे, तिसगावमधील मटका, जुगार, चक्री, अवैध दारू विक्री असे अवैध धंदे बंद करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकार्यांना प्रोत्साहित केल्याचा राग मनात धरून तिसगाव येथील एका चालकाने त्यांना वृद्धेश्वर हायस्कूल चौकात बोलावून घेत शिवीगाळ करत पंटरांकडून रस्त्यावर अपघात घडवून संपवून टाकण्याची धमकी दिल्याचे निवेदनात म्हटले आहे.
येथील अवैध धंदे करणार्यांपासून नागरिकांच्या धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी साळवे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांकडे केली आहे. तिसगाव येथील अवैध धंद्याबाबत मोठ्या प्रमाणात तिसगावसह परिसरातील नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने ग्रामपंचायतीने हे सर्व अवैध धंदे बंद करण्याचा ठराव केला त्यानंतर पोलिसांनी देखील अवैध धंद्यावर कारवाई सुरू केली. तेव्हापासून अवैध धंदे करणार्यांचे पित्त खवळले असल्याचे सुत्रांनी सांगितले.