तिसगाव अतिक्रमणप्रश्‍नी झेडपीसमोर उपोषण

गारूडकर यांचा इशारा
तिसगाव अतिक्रमणप्रश्‍नी झेडपीसमोर उपोषण

तिसगाव (वार्ताहर) / Tisgaon - तिसगावच्या वेशीजवळ केलेले अतिक्रमण हटविण्याचे पंचायत समितीकडून मिळालेले आश्‍वासन हवेतच विरल्याने सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक गारूडकर यांनी आता जिल्हा परिषदेसमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. Ahmednagar Zilla Parishad

पाथर्डी तालुक्यातील तिसगाव हे ऐतिहासिक वास्तूंचे शहर म्हणून ओळखले जाते. येथे पुरातन काळातील अतिशय आकर्षक अशा तीस वेशी आहेत. गेल्या काही दिवसांपासून या वेशींना अतिक्रमणाचा विळखा पडत असल्याने या वास्तू आता नामशेष होत आहेत की काय असा प्रश्‍न आता निर्माण होऊ लागला आहे. तिसगाव येथील बाजारतळ व वेशीजवळ अतिक्रमण करून पक्के बांधकाम करण्याचा प्रयत्न सुरू असून ऐतिहासिक वास्तूजवळ अतिक्रमण करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी गारुडकर यांनी पाथर्डी पंचायत समितीकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती.

याप्रश्‍नी ते पाथर्डी पंचायत समितीच्या कार्यालयासमोर उपोषणालाही बसले होते. ‘अतिक्रमणाची चौकशी समिती स्थापन करून चौकशी समितीचा अहवाल येताच संंबंधितांवर कारवाई करू’ असे लेखी आश्‍वासन गटविकास अधिकारी शीतल खिंडे यांनी दिले होते. मात्र, आठ-दहा दिवस होऊनही समिती स्थापन करण्यात आली नाही. त्यामुळे गारुडकऱ यांनी आता थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या दालनासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.

येथील अतिक्रमणाविरोधात गारुडकर यांचा एकाकी लढा सुरू असून बाजारतळ परिसर व ऐतिहासिक वेशीजवळ सुरू असलेले बांधकाम तात्काळ बंद करून संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी गुरुवारी (दि. 1 जुलै) जिल्हा परिषदेसमोर उपोषण बसणार असल्याचा इशारा गारूडकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

राजकीय अभय अन् अधिकार्‍यांचा कानाडोळा

तिसगावमध्ये खुलेआमपणे ग्रामपंचायत मालकीच्या जागांवर अतिक्रमण करणार्‍यांना राजकीय अभय असल्यानेच प्रशासन देखील कारवाई करण्याचे धाडस दाखवत नाही. शासनाच्या जागेवर होणारे अतिक्रमण रोखण्याची जबाबदारी संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांची आहे. मात्र, हे अधिकारी अतिक्रमणांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याची खंत गारूडकर यांनी व्यक्त केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com