
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
राज्यातील अ व ब वर्ग नगरपालिकेतील शिक्षकांच्या थकित पगाराबाबत पाठपुरावा केल्याने त्यांचा पगाराचा मार्ग मोकळा झाला. याकामी श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. म्हणून त्यांचा शिक्षक संघाच्यावतीने नुकताच सत्कार करण्यात आला.
राज्यातील अ वर्ग व ब वर्ग नगरपालिकांमधील शिक्षण मंडळातील शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अनेक महिन्यांपासून 20 टक्के व 10 टक्के हिस्सा थकीत असल्याने पगार रखडले होते. राज्याच्या नगरविकास खात्याचे आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी यांनी श्रीरामपूर नगरपालिकेच्या भेटी दरम्यान नगरपालिका, महानगरपालिका शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांनी निवेदनाद्वारे या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले होते. त्यावेळी त्यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते.
यापुढे शिक्षकांचे दरमहाचे वेतन सुरळीत होईल व अनुदान थेट शिक्षण मंडळाच्या प्रायमरी स्कूल फंड या खात्यात वर्ग करण्यात येईल, असे सांगत त्यांनी कार्यवाही सुरू केली. थकित रकमेसाठी नगरपालिकेने स्वतंत्र मागणी नोंदवावी, त्याप्रमाणे राज्यातील नगरपालिकांकडून मागणी घेऊन त्याचा पाठपुरावा आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी यांनी केला. वित्त विभागाकडून रक्कम प्राप्त करून घेत थकित रकमेचेे 3 मे ला परिपत्रक निर्गमित केले. नगरपालिकेतील कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी, प्राथमिक शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षक यांचे पगारासाठीच ही रक्कम वापरता येईल, असे आदेशात स्पष्ट नमूद केले.
याकामी श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, मुख्य लेखापाल निकाळे, वरिष्ठ लिपिक श्री. जाधव यांनी पाठपुरावा केला. त्याबद्दल त्यांचा नगरपालिका, महानगरपालिका शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांचेवतीने नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी राज्य संघटक नवनाथ अकोलकर, जिल्हाध्यक्ष फारुक शाह, शिक्षण मंडळाचे लेखापाल रूपेश गुजर, सदिच्छा मंडळाच्या अध्यक्षा प्रतिभा जयकर, जिल्हा प्रतिनिधी सचिन शिंदे उपस्थित होते.