कर्जत शहरात टायर चोरी करणारी टोळी गजाआड

२५ टायर व पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
कर्जत शहरात टायर चोरी करणारी टोळी गजाआड

कर्जत | प्रतिनिधी

जोहिन सलीम सय्यद रा. कुंभार गल्ली, कर्जत यांचे राशीन रोडवर कर्जत येथे बहार नावाचे टायर पंचर दुकान आहे. या दुकानात ट्रकचे जुने २५ टायर कंपनी रिप्लेसमेंटसाठी जमा करून ठेवले होते. टायर पंक्चरचे दुकान बंद करून रात्री घरी गेले.

२३ व २४ एप्रिलच्या रात्री ठेवलेले टायर अंधाराचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले अशी फिर्याद सय्यद यांनी दाखल केली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी अधिकारी व अंमलदार यांना तात्काळ सूचना व मार्गदर्शन करून हा गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिल्या.

तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेज व इतर गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल व आरोपीचा शोध सुरू केला. तपासात आरोपी हे राशीन येथील असल्याचे समजले. सविस्तर माहिती घेऊन पोलिसांनी राशीन येथील एकूण सहा आरोपींना ताब्यात घेतले.

महेश दिपक माने, जगदंबा मंदिरामागे, राशीन, विशाल गंगा जाधव, जुना बैल बाजार, राशीन, अभिषेक उर्फ बबलू विजय घोडके, वसंत गल्ली, राशीन, अविनाश गणपत भाले, गारुड गल्ली, राशीन, राहुल संतोष उफाडे, सरकारी दवाखाण्याजवळ, राशीन, ता. कर्जत, एक अल्पवयीन, रा. राशीन यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली. त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले.

त्यांनी गुन्ह्यात वापरलेला छोटा हत्ती आणि जितो अशी २ चार चाकी वाहने पोलिसांनी हस्तगत केली. गुन्ह्यातील चोरलेले २५ टायर हस्तगत केले. एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत केला असुन ५ आरोपींना अटक केली. त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस जवान पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, सुनील खैरे, गोवर्धन कदम, शाहूराज तिकटे, यांनी केली. पुढील तपास पोलीस हवालदार महादेव गाडे हे करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com