
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील तिळवणी प्रथमिक आरोग्य केंद्राला मंत्रालय स्तरावर तातडीने मान्यता देण्यात यावी यासाठी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी नुकतीच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले आहे.
कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने होत असलेली गैरसोय लक्षात घेवून कोपरगाव मतदार संघातील तीळवणी येथे ना. आशुतोष काळे यांनी जिल्हा नियोजन समितीकडून प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळविली आहे. मात्र जिल्हा नियोजन समितीची मान्यता मिळाल्यानंतर मंत्रालय स्तरावर मान्यता मिळणे आवश्यक असून त्यांनतरच निधीची तरतूद होणार आहे. त्यामुळे आशुतोष काळे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेवून त्यांना लवकरात लवकर तिळवणी प्रथमिक आरोग्य केंद्राला मंत्रालय स्तरावर मान्यता द्यावी यासाठी साकडे घातले.
पूर्व भागातील नागरिकांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालय जवळपास 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्यामुळे तातडीने उपचार आवश्यक असणार्या रुग्णांना खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत असून त्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. तिळवणी प्रथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून तिळवणीसह कासली, शिरसगाव, आपेगाव, उक्कडगाव, सावळगाव, गोधेगाव, घोयेगाव आदी कोपरगाव तालुक्यातील गावांसह वैजापूर तालुक्यातील नजीकच्या गावातील नागरिकांचे आरोग्य आबाधित राहण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
त्यासाठी तिळवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मंत्रालय स्तरावर मान्यता मिळावी अशी आग्रही मागणी ना. आशुतोष काळे यांनी यावेळी केली. सदर मागणीला प्रतिसाद देत लवकरच तिळवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मंत्रालय स्तरावर मान्यता देण्यात येईल, अशी ग्वाही आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी ना. आशुतोष काळे यांना दिली आहे.