टिळकनगर पगारदार पतसंस्थेचे चार संचालक अपात्र

अ‍ॅडव्हान्स घेतलेली रक्कम परत करण्यास केला कसूर
टिळकनगर पगारदार पतसंस्थेचे चार संचालक अपात्र

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील टिळकनगर परिसर उद्योग समूह पगारदार सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या. टिळकनगर या संस्थेचे चेअरमनसह चार संचालकांनी संस्थेतून बेकायदेशीररित्या 10 लाख 89 हजार 352 रुपये अ‍ॅडव्हान्स रक्कम उचल घेऊन ती तीस दिवसांच्या आत संस्थेला परत करण्यास कसुर केल्यामुळे त्यांना संस्थेच्या संचालक पदावरून निष्प्रभावित करीत असल्याचा आदेश सहायक निबंधक विजयसिंग उत्तमसिंग लकवाल यांनी दिला आहे.

संस्थेच्या संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांनी सन 2017-18, 18-19 व 19-20 या कालावधीत मोठ्या प्रमाणात अ‍ॅडव्हान्स रक्कम उचल घेतली असून या रक्कमांचा पुन्हा भरणा केला नाही. त्यामुळे संस्थेचे आर्थिक नुकसान झाले असून याबाबत चौकशी करावी, अशी तक्रार शांतवन लक्ष्मण सोनवणे यांनी सहायक निबंधकांकडे दाखल केली होती. त्यावरून सेवानिवृत्त लेखापरीक्षक पं. र. आरणे यांची चौकशी अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली होती.

पं. र. आरणे यांनी संस्थेची चौकशी करून चौकशी अहवाल सहायक निबंधक कार्यालयास सादर केला होता. सदर चौकशी अहवालानुसार दि. 1 एप्रील 2020 रोजी इतर अ‍ॅडव्हान्स खाती व डिव्हीडंट वाटप या शिर्षकाखाली 12 व्यक्तीकडे एकूण रु. 10,89,352 इतकी रक्कम येणे असून त्यापैकी पतसंस्थेच्या संचालकांकडे अ‍ॅडव्हान्स रक्कमा येणे शिल्लक आहे. संचालक बाळासाहेब गणपत विघे यांनी 9,19, 595 रुपये, अनिल माणिकराव जेधे 12,133 रुपये, संचालिका मिनाबाई कैलास चावरे 4,712 रुपये व शोभाबाई सुरेश बग्गन 5850 रुपये बेकायदेशीररित्या संस्थेतून अ‍ॅडव्हान्स रक्कम उचल केलेली आहे. सदरच्या रक्कमेचा भरणा केलेला नाही. यावरून त्यांना समिती सदस्य पदावरुन कमी करणेबाबतची नोटीस देऊन संबंधितांना सहायक निबंधक कार्यालयात सुनावणीसाठी उपस्थित राहुन म्हणणे सादर करावे, असे कळविले होते. सुनावणीस अनिल माणिकराव जेधे, व बाळासाहेब गणपत विधे हे उपस्थित होते.

सुनावणीच्यावेळी अनिल माणिकराव जेधे यांनी त्यांच्याकडील अ‍ॅडव्हान्स 12,133 रुपये दि. 2 फेब्रुवारी 2021 रोजी संस्थेकडून उचल केलेल्या कर्ज रक्कमेतून भरणा करून दिले असलेबाबत नमूद केले होते. तसेच सोबत संस्थेची जमा पावती, कर्ज व्हाऊचर चलन, कर्ज मागणी अर्ज, किर्द पान व उतारा आदी सादर केलेे. तसेच बाळासाहेब विधे यांनी दि. 30 मार्च 2021 रोजी त्यांचेकडे येणे अ‍ॅडव्हान्स पोटी 2,00,000रुपये,. 50,000 रुपये व 39,500 रुपये असे संस्थेचे 3 चलन मिळून असा 2,89,500 रुपयेचा भरणा सादर केला. परंतु हा भरणा त्यांचे स्वतःचे अ‍ॅडव्हान्सपोटी असल्याबाबत संस्थेची जमा पावती सादर केलेली नाही. यावेळी त्यांनी उर्वरित रक्कम लवकरच भरणा करीत असलेबाबत लेखी खुलासा सादर केला परंतु तदनंतर आज पावेतो रक्कम भरणा केली असलेबाबत कोणताही पुरावा सादर केला नाही. सुनावणीकामी संचालिका मिनाबाई कैलास चावरे व शोभाबाई सुरेश बग्गन या उपस्थित राहिल्या नाहीत किंवा त्यांनी लेखी म्हणणे सादर केलेले नाही.

टिळकनगर परिसर उद्योग समूह पगारदार सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या. टिळकनगर या संस्थेची संघीय संस्था असलेली श्रीरामपूर तालुका पतसंस्थांचे सहकारी फेडरेशन मर्या. श्रीरामपूर या संस्थेसही नोटीस देऊन सदरबाबत अभिप्राय सादर करणेबाबत कळविण्यात आले होते. मात्र या संस्थेने अद्याप पावेतो कोणताही अभिप्राय सादर केला नाही. त्यामुळे सदरील कार्यवाहीसंबंधी त्यांचे काहीही म्हणणे नाही असे गृहित धरण्यात येत आहे. त्याअर्थी, संस्थेचे चेअरमन बाळासाहेब गणपत विधे, संचालक अनिल माणिकराव जेधे, संचालिका मिनाबाई कैलास चावरे व शोभाबाई सुरेश बग्गन यांनी संस्थेतून बेकायदेशीररित्या अ‍ॅडव्हान्स रक्कम उचल केलेली असून ती तीस दिवसांचे आत अग्रीम परत करण्यास कसुर केला आहे. त्यामुळे सदर संचालक हे कलम 73 कअ (1) (एक) (क)(1) (2) मधील तरतुदीनुसार संस्थेत सदस्य म्हणून राहण्यास अपात्र असल्याची खात्री झाली असून त्यानुसार या चार संचालकांना पदावरून निष्प्रभावित करीत असल्याचा आदेश सहायक निबंधक विजयसिंग लकवाल यांनी दिला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com