टिळकनगर कामगार पतपेढीचे चेअरमनसह चार संचालक अपात्र

प्रशासक नियुक्त
टिळकनगर कामगार पतपेढीचे चेअरमनसह चार संचालक अपात्र

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

चौकशी अहवालामध्ये अनियमितता दर्शवित इतर अ‍ॅडव्हान्स उचलण्याचे उदात्तीकरण झाल्याचा ठपका संचालक मंडळावर ठेवत संस्थेच्या चेअरमनसह चार संचालक संस्थेचे कसुरदार झाल्याने, निरहंता ओढवल्यामुळे अपात्र ठरवत टिळकनगर परिसर उद्योग समूह पगारदार सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या., टिळकनगर सा. श्रीरामपूर, जि. अहमदनगर या संस्थेचे संचालक मंडळ निष्प्रभावित करण्यात येऊन संस्थेवर प्राधिकृत अधिकारी नियुक्त करण्यात येत असल्याचा निर्णय सहकारी संस्था सहाय्यक निबंधक एस. पी. रुद्राक्ष यांनी दिला आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील अग्रगण्य समजल्या जाणार्‍या टिळकनगर परिसर उद्योग समूह पगारदार सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित टिळकनगर या संस्थेमध्ये 2015-2020 या कालावधीसाठी निवडून आलेल्या संचालक मंडळातील पदाधिकारी आणि संचालक यांनी मोठ्या प्रमाणात इतर अ‍ॅडव्हान्स उचल केलेला होता. त्यासंदर्भात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 अन्वये प. र. आरणे यांनी चौकशी अहवालामध्ये अनियमितता दर्शवित इतर अ‍ॅडव्हान्स उचलण्याचे उदात्तीकरण झाल्याचा ठपका संचालक मंडळावर ठेवलेला होता.

त्या अनुषंगाने संस्थेचे चेअरमन बाळासाहेब गणपत विघे, अनिल माणिकराव जेथे, श्रीमती मिनाबाई कैलास चावरे, श्रीमती शोभाबाई सुरेश वग्गन हे चार संचालक महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 73 (क अ) (1) एक) (क) (1) (2) नुसार संस्थेचे कसुरदार झाल्याने, निरहंता ओढवल्यामुळे अपात्र झाल्याचे घोषित करण्यात येऊन कलम 73 (कअ) पोटकलम (2) व (3) नुसार सदरचे पद ओढवल्यामुळे, समिती सदस्य असल्याचे बंद होऊन त्यांच्या जागा रिक्त झाल्याचे घोषित केलेले आहे. संस्थेचे व्हा. चेअरमन कारभारी बाबूराव गाडेकर मालक संस्थेतून निवृत्त झाल्याने मालक संस्थेत नोकर म्हणून त्याचे अस्तित्व संपल्याने त्यांचे सभासदत्व बंद झाले आहे.

दिलीप प्रल्हाद मोहोळ व आप्पासाहेब तात्याबा म्हसे यांनी संचालक पदाचे राजीनामे दिले आहेत. तसेच संस्थेचे संचालक शांतवन लक्ष्मण सोनवणे यांनी इतर अ‍ॅडव्हान्स जमा करत नाहीत म्हणून त्यांनीही संचालक पदाचा राजीनामा दिलेला होता. तसेच अशोक भिका त्रिभुवन, कासम हसन शेख, मालक संस्थेतून निवृत्त झाल्याने मालक संस्थेत नोकर म्हणून त्यांचे अस्तित्व संपल्याने त्यांचे सभासदत्य बंद झाले आहे.

माजी चेअरमन नारायण सदाशिव कुमावत यांनी देखील संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. अशा परिस्थितीत संस्थेमध्ये मार्च 2021 पासून कोरमअभावी संचालक मंडळाची सभा होत नसल्याने कार्यरत असलेल्या दोन संचालकांसह सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, श्रीरामपूर यांनी पुढील आदेश पारित केला आहे.

या प्रकरणाकडे दत्तनगर, टिळकनगर, रांजणखोल या भागाचे लक्ष लागून होते. यासाठी वेळोवेळी माजी संचालक शांतवन सोनवणे, नंदू गंगावणे, बबन माघाडे, रमेश भालेराव आदींनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, श्रीरामपूर या कार्यालयाकडे पाठपुरावा केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com