अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

टिळक रोडवरील पटेल यांचे शक्ती मार्बल्स येथील कारखान्यातील एका गोदामाला मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता मोठी आग लागली होती.

महापालिकेच्या अग्निशमन दलासह व्हीआरडी, राहुरी नगरपालिकाच्या अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याने रात्री उशिरा आग आटोक्यात आली. आगीमुळे परिसरामध्ये धुराचे लोट आणि दुर्गंध सुटला होता. या गोदामामध्ये फॅब्रिकेशनचे काम केले जाते. ल्युमिनियमचे दरवाजे बनवले जातात. त्यासाठी काही रसायनांचा वापर होतो. त्यामुळे आग आणखीनच भडकली होती.

गोदाम पूर्णपणे लोखंडी पत्र्याने बंदिस्त आहे. त्यामुळे आग विझविताना अडचणी येत होत्या. आगीमुळे गोदामामधील विद्युत प्रवाह खंडित झाला होता. त्यामुळे अंधार पसरला होता. रसायने आणि फॅब्रिकेशन जळाल्यामुळे परिसरामध्ये धुराचे लोट पसरले होते.

या कारखान्यात मोठ्या प्रमाणामध्ये प्लायवूड आणि इतर लाकडी साहित्य आहे. आग लवकर लक्षात आल्याने स्थानिक नागरिकांनी धावपळ केली आणि पुढील मोठा अनर्थ टळला. रात्री साडेदहानंतर देखील आग विझविण्याचे काम सुरू होते. आग लागलेल्या पत्र्याचे गोदाम फोडण्यासाठी अग्निशामक दलाने शेवटी जेसीबीचा वापर केला.

आग नेमकी कशामुळे लागली हे कळू शकले नाही. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. या आगीत सुमारे 30 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. यामुळे आग विझवण्यास अडथळे निर्माण होत होते. कोतवाली पोलिसांना कळवून देखील पोलीस घटनास्थळी हजर झाले नाही.