
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
चोरी करण्यासाठी आलेल्या तिघांनी युवकावर दगडफेक करत साडेचार तोळ्यांचे दागिने चोरून नेले आहेत. दगडफेकीत कौशीक विश्वास भानुसे (वय 17) हा युवक जखमी झाला आहे. सोमवारी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान पाईपलाईन रोडवरील रिध्दी-सिध्दी कॉलनीमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी कौशीक भानुसे याने फिर्याद दिली आहे.
कौशीक व त्याची आई शिला भानुसे रिध्दी-सिध्दी कॉलनीत राहतात. रविवारी शिला भानुसे या राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे नातेवाईकांकडे गेल्या होत्या. कौशीक घराच्या वरच्या मजल्यावर रूममध्ये झोपला होता. यानंतर तीन चोरट्यांनी बंद घर फोडून आत प्रवेश केला. घरातील सामानाची उचकापाचक करून दोन तोळ्याचे नेकलेस, दीड तोळ्याची चेन, एक तोळ्याचे कानातील वेल असा साडेचार तोळ्यांचा ऐवज चोरला. दरम्यान चोरट्यांचा आवाज ऐकून कौशीक जागा झाला. त्याने आरडाओरडा करताच चोरटे पसार झाले. जाताना चोरट्यांनी कौशीकवर दगडफेक केली. त्यात तो जखमी झाला आहे.