
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
तीन महिलांना कनिष्ठ न्यायालयाने दिलेली शिक्षा जिल्हा न्यायाधीश एम. आर. नातु यांनी अपीलात कायम केली आहे. शोभा अर्जुन भांड, अलका बाबासाहेब भांड व सविता भीमराज भांड (सर्व रा. निंबळक ता. नगर) अशी शिक्षा झालेल्या महिलांची नावे आहेत.
11 जुलै, 2008 रोजी यातील फिर्यादी सिंधुबाई राधाकिसन भांड यांच्या घरी महिला आरोपी आल्या व त्यांना धरून केस ओढले. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच ‘तू स्टॅम्पवर घेतलेली दोन गुंठे जागा परत दे’, या कारणावरून सिंधुबाईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दोन्ही हातावर, पायावर मारहाण करून जबर जखमी केले होते.
याप्रकरणी सिंधुबाई भांड यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि कलम 323, 235, 504, 506 सह 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रमाणे कनिष्ठ न्यायालयात सदर केसची चौकशी होऊन कनिष्ठ न्यायालयाने एक वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैद तसेच दंडाच्या रकमेतून रुपये 1500 फिर्यादीस नुकसान भरपाई देण्याचा आदेश केला होता.
सदर शिक्षा विरूध्द आरोपी यांनी येथील सत्र न्यायालयात फौजदारी अपील दाखल केले होते. सदर फौजदारी अपीलामध्ये आरोपी व सरकार पक्षाचा युक्तीवाद होऊन कनिष्ठ न्यायालयाने दिलेली वरिलप्रमाणे शिक्षा कायम ठेवली. सदरच्या अपिलाचे कामकाज अभियोग पक्षाच्यावतीने अॅड. मंगेश व्ही. दिवाणे यांनी पाहीले.