कोल्हारमध्ये टायरचे शोरूम फोडून तीन लाखांची चोरी

कोल्हारमध्ये टायरचे शोरूम फोडून तीन लाखांची चोरी

कोल्हार (वार्ताहर) / Kolhar - कोल्हार भागवतीपूरमध्ये गेल्या अनेक महिन्यापासून थंडावलेले चोरीसत्र पुन्हा सुरू झाले आहे. मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी येथील सुरेश रामनाथ निबे यांचे एमआरएफ टायर शोरूमचे शटर तोडून सुमारे 3 लाखांपेक्षा अधिक मुद्देमाल चोरल्याची घटना घडली. सदर दुकानात सलग तिसर्‍या वेळेस चोरीची घटना घडली आहे.

मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी सदर शोरूमच्या शटर खालील फरशी काढली. त्यानंतर शटर कटावणीच्या साहाय्याने उभे तोडले. चोरीपूर्वी येथील सीसीटीव्हीचे कनेक्शन आधी तोडून आपण कॅमेर्‍यात दिसणार नाही याची काळजी चोरट्यांनी घेतली. दुकानातील महागडे असलेले टायर टेम्पोत टाकून चोरटे पसार झाले.

सदर घटनेची माहिती लोणी पोलिसांना अवघ्या काही वेळातच समजल्याने कोल्हार पोलीस औट पोस्टला नियुक्त असलेले सहाय्य फौजदार बाबासाहेब लबडे व पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र औटी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. मध्यरात्री सदर दुकानाचे चालक सुरेश आर निबे यांना घरून पोलिसांनी दुकानात आणल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे समजले.

घटनेनंतर लोणीचे सपोनि समाधान पाटील यांनी तातडीने धाव घेतली. त्यानंतर नगरहून ठसे तज्ञ व श्‍वान यांना पाचारण करण्यात आले. सदर शोरूममध्ये सलग तिसर्‍या वेळी चोरीची घटना घडली आहे. मागील कुठल्याही चोरीचा तपास अद्याप लागलेला नाही. मात्र सध्या नियुक्त असलेले लोणी पोलीस स्टेशनचे सपोनि समाधान पाटील व पीएसआय नानासाहेब यांनी अनेक गुन्ह्याची उकल अल्पावधीत केली असल्याने सदर चोरीचा तपास होऊन चोरटे गजाआड होतील असा आशावाद सदर दुकानाचे चालक सुरेश निबे यांनी केला आहे. सदर चोरीनंतर चोरट्यांनी जणू कोल्हार भगवतीपूरकरांना इशाराच दिला आहे. आधीच करोना महामारीने आर्थिक चक्रात अडकलेल्या व्यापारी वर्गात मात्र यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर चोरीनंतर लोणी पोलिसांनी वेगवेगळे पथक तयार करून तपास सुरू केला आहे. लोणी पोलिसात 3 लाख 19 हजार रुपयांचा चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय नानासाहेब सूर्यवंशी करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com