सलाबतपूर । वार्ताहर । Salabatpur

सलाबतपूर, देवगडफाटा (वार्ताहर)- प्रवरासंगमच्या कापूस व्यापार्याचा साडेआठ लाख रुपयांच्या कापसासह ट्रक अपेक्षित ठिकाणी पोहच न करता

त्याची परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणातील आरोपींना नेवासा पोलिसांनी गुजरातमध्ये अटक केली असून त्यांच्याकडून ट्रक व कापूस ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, 9 नोव्हेंबर 2020 रोजी प्रवरासंगम येथील कापुस व्यापारी संदेश शरदलाल फिरोदीया यांचा 9 लाख 13 हजार 260 रुपये किंमतीचा कापूस ट्रकमध्ये ( क्र. जीजे 11 व्हीव्ही 8805) भरुन तो पटेल कॉटन इंडस्ट्रीज हळवद रोड धागद्रा जि. सुरेंद्रनगर येथे खाली करणे अपेक्षीत होते.

आरोपीत यांनी संगनमत करुन तसे न करता परस्पर विल्हेवाट लावून फसवणूक केली. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास प्रभारी अधिकारी अभिनव त्यागी यांनी सुरु केला.

गुन्ह्याचा तपास गुजरात राज्यात असल्याने पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिक्षक सुदर्शन मुंडे यांचे मार्गदर्शनाखाली तपास करत असताना सपोनि विजयकुमार ठाकुर, उपनिरीक्षक प्रदिप शेवाळे, पोलीस नाईक राहुल यादव, कॉन्स्टेबल महेश कचे अशोक कुदळे, वसिम इनामदार यांनी वेळोवेळी जामनगर (गुजरात) येथे जावून अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालयाकडील पोलीस नाईक फुरकान शेख, कॉन्स्टेबल प्रमोद जाधव तसेच स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस नाईक श्री. शिंदे व श्री. सोनटक्के यांनी केलेल्या तांत्रिक मदतीने गुजरात राज्यातुन कान्हा उर्फ देवल दिनेशभाई डाभी (वय 25) रा. दरेड ता.जि .जामनगर, बंदिया राम सोमात (वय 23) धंदा- गाडी व्यापार रा. जामनगर व भरतभाई आंबाभाई मांगुकिया (वय 48) रा. न्यु कतारगाव जि. सुरत यांना अटक करण्यात आली.

असून त्यांच्याकडुन गुन्ह्यात वापरलेली ट्रक तसेच बेंडवान ता. डेडीयापाडा जि. नर्मदा (गुजरात राज्य) येथुन गुन्ह्यातील 8 लाख 48 हजार रुपये किंमतीचा कापूस जप्त करण्यात आला आहे.

सदर आरोपीतांवर धरणगाव पोलीस स्टेशन जि. जळगाव येथे भादवी 407,34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

पुढील तपास भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी व नेवाशाचे प्रभारी अधिकारी अभिनव त्यागी, कॉन्स्टेबल अशोक कुदळे करत आहेत.