शेंडीबायपास शिवारात वाहन चालकांना लुटणारे तिघे अटकेत

शेंडीबायपास शिवारात वाहन चालकांना लुटणारे तिघे अटकेत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शेंडी बायपास (ता. नगर) शिवारात रात्रीच्यावेळी वाहन चालकांना लुटणार्‍या टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केेली. स्वप्नील ऊर्फ आदित्य अशोक पाखरे (वय 25 रा. नागरदेवळे ता. नगर), किशोर ऊर्फ ईश्‍वर दिलीप शिंदे (वय 24 रा. देहरे ता. नगर), महेश मनाजी ऊर्फ मनोहर शिंदे (वय 28 रा. विळद ता. नगर) असे अटक केलेल्या लुटारूंची नावे आहेत. यांच्या सोबत असलेले आकाश पांडूरंंग शिंदे (रा. विळद), गणेश शिंदे, सागर शिंदे हे पसार झाले आहेत.

अलीकडच्या काळात शेंडी बायपास शिवारात लुटीच्या घटना वाढल्या आहेत. 10 मे रोजी अनिकेत सुधाकर सावंत (रा. वडगाव मावळ जि. पुणे) यांना काही लुटारूंनी लुटले होते. त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाढत्या लुटीच्या घटना लक्षात घेता पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्वतंत्र पथक स्थापन केले. हे पथक मागील आठ दिवसांपासून शेंडी शिवारात एक मालवाहू टेम्पोमध्ये आपल्यातील पोलिसांना बसवून सापळा लावत होते. टेम्पोच्या आसपास इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी तबा धरून बसत होते. मंगळवारी पहाटे सापळा लावलेला असताना दुचाकीवरून तिघे लुटारू आले.

त्यांनी टेम्पोमधील कर्मचार्‍याच्या गळ्याला कोयता लावून पैशाची मागणी केली. याच वेळी त्यांच्यासोबत टेम्पोमध्ये बसलेल्या इतर पोलिसांनी आरोपीवर झडप मारून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता एक जण पोलिसांच्या हाती लागला. तर दोघे दुचाकीवरून पसार झाले. पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पिंपळगाव माळवी शिवारात पकडले. पोलीस निरीक्षक कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मिथून घुगे, सोमनाथ दिवटे, उपनिरीक्षक गणेश इंगळे, सहायक फौजदार मन्सूर सय्यद, पोलीस कर्मचारी शिवाजी ढाकणे, विशाल दळवी, संदीप पवार, सुरेश माळी, रवी सोनटक्के, सागर ससाणे, मच्छिंद्र बर्डे, रोहित येमूल, रणजित जाधव, संभाजी कोतकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com