सबस्टेशनमधील कर्मचार्‍याला शिवीगाळ करत धमकी

जेऊर येथील प्रकार : दोघांविरूध्द गुन्हा
सबस्टेशनमधील कर्मचार्‍याला शिवीगाळ करत धमकी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जेऊर बायजाबाई (ता. नगर) येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनमधील कर्मचार्‍यांना दोघांनी शिवीगाळ करत धमकी दिली. न विचारता वीज बंद केल्याच्या कारणातून मंगळवारी सायंकाळी हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी बुधवारी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्याम भास्कर भांड (वय 25 रा. धनगरवाडी ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. नाथकृपा इंडस्ट्रीजचे मालक विजय संपत दारकुंडे (वय 20) व राजेंद्र पाराजी दारकुंडे (दोघे रा. जेऊर बायजाबाई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

मंगळवारी सायंकाळी फिर्यादी व त्यांचे सहकारी सबस्टेशनमध्ये ड्युटीवर असताना विजय व राजेंद्र दारकुंडे तेथे आले. ते फिर्यादीला म्हणाले,‘तु मला न विचारता, मला फोन न करता, अचानकपणे लाईट बंद का केली, मला कोणतीही पूर्व कल्पना का दिली नाही’, असे म्हणून शिवीगाळ केली. ‘तु पुन्हा मला न फोन करता लाईट बंद केली तर तुमच्याकडे पाहुन घेतो’, अशी धमकी देवून फिर्यादी करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हंडाळ करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com