महात्मा गांधींचे विचार प्रेरणादायी - सॅम पित्रोदा

महात्मा गांधींचे विचार प्रेरणादायी - सॅम पित्रोदा

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

जगामध्ये वाढत चाललेली अशांतता व वर्चस्ववाद हे मानवतेला अत्यंत धोकादायक असून शांततेतूनच सर्वांची प्रगती होत असते. मात्र या शांततेसाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दाखवलेल्या आदर्श विचारांची व तत्वांची जगाला गरज असून स्वायत्त संस्थांचा व माध्यमांचा गैरवापर लोकशाहीला धोकादायक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व राजकीय विश्लेषक पद्मभूषण सॅम पित्रोदा यांनी केले आहे.

जय हिंद लोक चळवळीच्या वतीने आयोजित दुसर्‍या ऑनलाईन ग्लोबल कॉन्फरन्समध्ये ते जागतिक शांतता सुसंवाद व प्रगती या विषयावर बोलत होते. अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या द्रोणागिरी हॉलमध्ये झालेल्या उद्घाटनपर कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करून जय हिंद लोक चळवळीचे संस्थापक अध्यक्ष आ. डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, समन्वयक उत्कर्षा रुपवते, हिरालाल पगडाल, सुहास आहेर, सौदामिनी कान्होरे, डॉ.संतोष खेडलेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डॉ. एम.ए व्यंकटेश यांच्या उपस्थितीमध्ये दीपप्रवलन करण्यात आले. यावेळी ऑनलाईन पध्दतीने महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात, सत्यजीत तांबे, अमेरिकेन हून डॉ. सुरज गवांदे यांनी सहभाग घेतला. या आंतरराष्ट्रीय ग्लोबल कॉन्फरन्समध्ये 61 देशातील सुमारे 36 हजार नागरिकांनी सहभाग नोंदवला.

या चर्चासत्रात बोलताना सॅम पित्रोदा म्हणाले, भारत ही संत महात्म्याची भूमी आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे भारताला मिळालेले एक आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व आहे. त्यांनी सत्य, अहिंसेचा मार्ग दाखवून जगामध्ये शांतता निर्माण करण्याचे काम केले. पहिल्या महायुद्धानंतर या मार्गाचा अवलंब केल्याने जगामध्ये शांतता नांदली. प्रत्येक देशामध्ये गांधीजींचा विचार अतिशय महत्त्वाचा असून शेवटी विजय सत्याचा होतो हे त्यांचे ब्रीद वाक्य प्रत्येकाला प्रेरणा देत असते. सध्या भारतात काही शक्तींनी विविध सरकारी संस्था व माध्यमे ताब्यात घेतली असून ते लोकशाहीची गळचेपी करत आहे. याला पर्याय महात्मा गांधी यांचे विचार अनुकरुन अशा शक्तीं विरुध्द सर्वांनी एकजुटीतून उभे राहिले पाहिजे असे आवाहन करतांना गांधीजींच्या विचारांतून प्रेरणा घेत प्रत्येकानं सजीव सृष्टी, पर्यावरण व आपल्या माणसांची काळजी घ्यावी असे ते म्हणाले.

तर अफगाणिस्थानच्या झरीफा गफारी म्हणाल्या, प्रत्येक देशाने आपापल्या ताकतीवर प्रगती साधली आहे मात्र या प्रगतीमध्ये वाढलेला वर्चस्ववाद हा काहीसा धोकादायक ठरू शकतो मात्र संपूर्ण जगाला शांततेचा आणि एकात्मता मंत्र देणारे महात्मा गांधी हे खर्‍या अर्थाने आंतरराष्ट्रीय पुरुष होते. स्त्रियांना पारंपारिक जोखडातून मुक्त करण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार जगाला दिशादर्शक ठरला. गांधीजींच्या विचारांची गरज असून यातून अफगाणिस्थान सह जगात शांतता नांदेल असे ही त्या म्हणाल्या.

गांधीजींचे पंतू अरुण गांधी म्हणाले , महात्मा गांधी यांचा देश असलेल्या भारताने जगाला अनेक गोष्टी दिल्या आहेत. महात्मा गांधी हे फक्त एका देशापुरते नसून ते जगाचे आहेत त्यांनी दक्षिण आफ्रिकेमधून केलेली सुरुवात भारतामध्ये पोहोचली आणि भारत आज शांततेचा पुरस्कर्ता म्हणून जागतिक पातळीवर उभा आहे. ते सर्व गांधींजींमुळे आहे. त्यांच्या विचारांवर काम करणारी जयहिंद लोकचळवळ नवभारताच्या उभारणीत महत्वाचे योगदान देईल असेही ते म्हणाले.

या चर्चासत्रामध्ये अफ्रिकेतून झेपन झिंबे, रॉबर्ट कॅराबिनचक, राष्ट्रीय संत रविंद्र मुनीजी, अमेरेझा समरबक्ष, तुक्रीचे प्रा. उगर इरुली, कुमार कलानंद मनी यांनी जागतिक शांतता या विषयावर आपले मत व्यक्त केले.

यावेळी आमदार डॉ. तांबे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविकात जय हिंद लोकं चळवळीचा उद्देश निरोगी समाज व्यवस्थेसाठी करत असलेल्या गोष्टी आणि महात्मा गांधी यांच्या प्रेरणादायी विचारांबाबत असलेल्या ग्लोबल कॉनफरन्स विषयी माहिती दिली. याप्रसंगी जयहिंद लोकचळवळीचे माजी समन्वयक संदिप खताळ यांना अभिवादन करण्यात आले.

मान्यवरांचे स्वागत व ग्लोबल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कर्षा रूपवते व संकेत मुनोत यांनी केले तर डॉ. सुरज गवांदे यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com