जिल्हा बँकेवर थोरात-पवार गटाचे निर्विवाद वर्चस्व

जिल्हा बँकेवर थोरात-पवार गटाचे निर्विवाद वर्चस्व

निवडणुकीत कर्डिले, शेळके, पिसाळ अन् गायकवाड यांची बाजी

अहमदनगर (प्रतिनिधी) -

राज्याचे लक्ष लागून असलेल्या नगर जिल्हा सहकारी बँकेवर अखेर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीच्या गटाने निर्विवाद

वर्चस्व सिद्ध केले आहे. रविवारी चार जागांच्या झालेल्या मतमोजणीत विद्यमान संचालक शिवाजीराव कर्डिले, उदय शेळके, अंबादास पिसाळ हे सोसायटी मतदारसंघातून मोठ्या माताधिक्याने विजयी झाले आहेत. तर बिगरशेती मतदारसंघातून चूरस पूर्ण झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रशांत गायकवाड यांनी बाजी मारली आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार विद्यमान संचालक दत्तात्रय पानसरे यांचा पराभव केला.

साधारणपणे दिड महिनाभरापूर्वी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानंतर उमदेवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रियादरम्यान 21 संचालकांच्या जागांसाठी 195 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. माघारीच्या अखेरच्या दिवशी नेतेमंडळींनी प्रयत्न केल्याने बँकेच्या 17 जागा बिनविरोध निघाल्या होत्या. तर बिगर शेती मतदारसंघासह नगर, पारनेर आणि कर्जत सोसायटी मतदारसंघासाठी निवडणूक लागली होती.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सुरूवातीपासून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवाार यांनी लक्ष घातले होते. जिल्हा बँकेचे मतदार सभासद हे मर्यादित असल्याने या ठिकाणी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात थोरात-पवार यांना यशही आले. मात्र, चार ठिकाणी एकमत न झाल्याने अखेर त्या ठिकाणी निवडणूक लागून शनिवारी मतदान झाले होते. काल रविवारी सकाळी मतमोजणी झाली. यात नगर तालुका सोसायटी मतदारसंघातून विद्यमान संचालक कर्डिले विजयी झाले. त्यांना 105 पैकी 94 मते मिळाली. तर विरोधी सत्यभामा बेरड यांना अवघी 15 मते मिळाली.

पारनेर सोसायटी मतदारसंघातून विद्यमान संचालक उदय शेळके यांनी विरोधी रामदास भोसले यांच्यावर एकतर्फी मात केली. शेळके यांनी 99 तर भोसले यांना अवघी 6 मते मिळाली. कर्जत सोसायटी मतदारसंघात आ. राधाकृष्ण विखे पाटील समर्थक अंबादास पिसाळ यांनी एका मताने बाजी मारली. या ठिकाणी थोरात गटाच्या आणि विद्यमान संचालिका मिनाक्षी सांळुके यांना 36 तर पिसाळ यांना 37 मते मिळाली. यात एका मताने सांळुके यांचा पराभव झाला. अत्यंत चुरशीच्या आणि जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या बिगर शेती मतदारसंघात अखेरच्या दोन दिवसांत उपमुख्यमंत्री पवार यांनी लक्ष घातल्याने या ठिकाणी प्रशांत गायकवाड यांचा विजय सुकर झाला. मात्र, त्यांना विद्यमान संचालक पानसरे यांची चांगली टक्कर दिली. पानसरे यांना अनपेक्षीतपणे जादा मते मिळाली असल्याचे मतमोजणीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत आघाडीवर असणारे गायकवाड यांनी दुसर्‍या फेरीत आघाडी कायम राखली या मतदारसंघात 1 हजार 341 मतांपैकी 763 गायकवाड यांना तर पानसरे यांना 574 मते मिळाली. तर चार मतपत्रिका बाद ठरविण्यात आल्या.

...................

कर्जतमध्ये विखेंची पवारांवर मात

कर्जत सोसायटी मतदारसंघात अवघ्या एका मताने आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे समर्थक अंबादास पिसाळ विजयी झाले आहेत. ही लढत प्रतिष्ठेची झाली होती. दोन्ही गटांनी जोर लावला होता. अखेर खासदार डॉ.सुजय विखे समर्थकांनी राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांना निकालातून धक्का दिला. जामखेड सोसायटी मतदारसंघात आ. पवार यांनी जळवून घेत विखे समर्थक अमोल राळेभात यांना बिनविरोध विजयी केले होते. मात्र, कर्जतमध्ये पडद्याआड जोरदार राजकारण रंगले. या मतदारसंघात बारामती येथून कुमक माविण्यात आली होती. मात्र विखे समर्थकांनी पिसाळ यांच्यामागे ताकद उभी करून मतदारसंघ राखला.

.......

यापूर्वी बिनविरोध झालेले संचालक

सेवा सोसायटी मतदारसंघात अकोले तालुक्यातून विद्यमान चेअरमन सिताराम पाटील गायकर, संगमनेर माधवराव कानवडे, कोपरगाव विवेक कोल्हे, श्रीरामपूर भानुदास मुरकुटे, नेवासा जलसंधारण मंत्री शंकराव गडाख, शेवगाव चंद्रशेखर घुले पाटील, राहाता अण्णासाहेब म्हस्के, जामखेड अमोल राळेभात, पाथर्डी आमदार मोनिकाताई राजळे , श्रीगोंदा राहुल जगताप, राहुरी अरुण तनपुरे, शेती पूरक मतदारसंघातून आशुतोष काळे, महिला राखीव अनुराधाताई नागवडे, आशाताई तापकीर, भटक्या विमुक्त मतदार संघ गणपतराव सांगळे, ओबीसी मतदारसंघ करण ससाणे तर अनुसूचित जाती मतदार संघातून अमित भांगरे यांची जिल्हा बँकेवर बिनविरोध संचालक म्हणून निवड झाली आहे.

....................

साधारणपणे सकाळी 9.30 वाजता सोसायटी मतदारसंघाचे सर्व निकाल हाती आले. यात कर्डिले, पिसाळ आणि शेळके विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. जिल्हा बँकेच्या शेजारी असणार्‍या बाजार समितीच्या आवारात कर्डिले यांचे कार्यालय आहे. त्याठिकाणी जोरदार फटक्यांची आतिषबाजी करण्यात येवून गुलालाची उधळण करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्याने कार्यकर्ते उपस्थित होते.

....................

जिल्हा बँकेला छावणीचे स्वरूप

जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या शेजारी असणार्‍या सभागृहात मतमोजणी सुरू होती. यामुळे जिल्हा परिसरात आणि गेटवर पोलीस अधिकार्‍यांसह 150 पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तीन चार ठिकाणी तपासणी करून पोलीस उमेदवार अथवा त्यांच्या समर्थकांना आत सोडत होते. यासाठी विशेष पासची व्यवस्था करण्यात आली होती.

.....................

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com