यंदाही सरासरीच्या 98 टक्के पाऊस पडणार, मुळा धरण वेळेतच भरणार

राहुरी विद्यापीठाच्या हवामान विभागाचे देठे यांचा अंदाज
पाऊस
पाऊस

देवळाली प्रवरा (वार्ताहर) - यंदाही पाऊस समाधानकारक असून सरासरीच्या 98 टक्के पाऊस पडणार आहे. तसेच नगर जिल्ह्याची जिवनदायीनी असलेले मुळा धरण वेळेतच पूर्ण क्षमतेने भरणार असल्याचा अंदाज महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे हवामान विभागाचे मोहनराव देठे यांनी व्यक्त केला आहे. ही शेतकरी बांधवांसाठी आनंदाची वार्ता आहे.

सलग तीन वर्ष दुष्काळात होरपळून निघालेल्या शेतकरी बांधवांना मागीलवर्षी चांगला पाऊस झाल्याने दिलासा मिळाला. धो-धो पाऊस पडल्याने मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने तीन वेळा धरणातून पाणी सोडण्याची घटना इतिहासात पहिल्यांदा घडली. यंदाही तशाच प्रकारचा पाऊस असल्याचा अंदाज देठे यांनी व्यक्त केला आहे.

गेली सलग तीन वर्ष देठे तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज दै. सार्वमतच्या माध्यमातून व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे त्यांचा अंदाज अचूक ठरत आहे. यंदाही त्यांनी अंदाज व्यक्त केला आहे. 20 वर्षा पासून दरवर्षी हवामानात होणारा बदल, हवेतील आर्द्रता, वार्‍याची दिशा व त्या-त्या वर्षी पडलेला पाऊस यावरुन ते पावसाचा अंदाज व्यक्त करतात.

देठे यांनी सांगितले, यंदा राज्यात मान्सून लवकर दाखल होणार असून 10 ते 11 जून पासून पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. परंतु जूनमध्ये समाधानकारक पाऊस नसला तरी जुलै, ऑगष्टपासून सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत धो-धो पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सध्या हवेतील आर्द्रता 75 च्या आसपास असून वार्‍याचा वेग ताशी 6 ते 7 किमी इतका आहे. 29, 30 व 31 मे या तारखेला होणार्‍या वादळाचा नगर जिल्ह्यावर फारसा प्रभाव पडणार नाही. या दरम्यान हलक्या पावसाची शक्यता आहे. सध्या दिवसाचे तपमान सरासरी 39 ते 40 अंश सेल्शियस आहे. याचा चांगला फायदा होणार असून धो-धो पावसाची यंदा शक्यता आहे. हे तपमान पुढील महिन्यात म्हणजे जूनमध्ये कमी होण्याची शक्यता आहे. मागीलवर्षीही जूनमध्ये 35 अंश सेल्शियस तपमान होते. यंदाही तसेच राहण्याची शक्यता आहे. सध्याची वार्‍याची दिशा, हवेतील आर्द्रता व तपमान याचा अभ्यास केला असता यंदाही समाधानकारक पाऊस बरसणार आहे. जून महिन्याचा अपवाद वगळता पुढे चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज देठे यांनी वर्तविला असून शेतकरी बांधवांनी याचा लाभ घेऊन शेतीपिकांचे नियोजन करावे, असे आवाहनही देठे यांनी केले आहे.

लॉकडाऊनचा परिणाम

लॉकडाऊनमुळे कारखाने बंद असल्याने व रस्त्यावरील वाहनांची वर्दळ अत्यंत कमी असल्याने हवेतील प्रदूषण मोठ्या प्रमाणात थांबले आहे. याचा अनुकूल परिणाम हवामानावर झाला आहे. त्यामुळे चांगला पाऊस होण्याची दाट शक्यता असल्याचे मोहनराव देठे यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com