
कोंढवड (वार्ताहर)
गेल्या वर्षी कापसाला चांगला भाव मिळाल्याने उसाच्या पटीत कापसाचे पैसे झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे यावर्षी राहुरी तालुक्यात कपाशीची विक्रमी लागवड होणार असून त्यासाठी शेतीची पूर्वमशागत करण्यासाठी शेतकरी वर्गामध्ये लगबग सुरू आहे.
दरम्यान यंदा मान्सून वेळेवर दाखल होऊन दमदार पाऊस पडण्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. उसाच्या पाठोपाठ नगदी पीक म्हणून कपाशीच्या पिकाकडे पाहिले जाते. मात्र, उसाची तोडणीअभावी फरपट पाहता शेतकऱ्यांनी खोडवा किंवा त्यानंतरचे उसाचे पीक न घेता त्याठिकाणी कपाशीसाठी तयारी सुरू केली आहे. तसेच कपाशीचे बियाणे शासनाने मुबलक प्रमाणात वेळेवर उपलब्ध करून दिल्याने बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी केले आहे. तर काहींनी मोठ्या प्रमाणावर आगास कपाशीच्या लागवडीसुद्धा केल्या आहेत. तर काही पाऊस पडल्यानंतर वातावरणातील उष्णता कमी होण्याची वाट पाहत आहेत.
उसाची वाताहत झाल्याने शेतकरीवर्ग भुसार पिकाकडे असला तरी मका, सोयाबीनवर रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल् कपाशीला प्राधान्य देत पूर्वमशगतीची त्यांची लगबग सुरू आहे. बाजारभावाने व निसर्गाने चांगली साथ दिली तर यावर्षी या पांढऱ्या सोन्यामुळे बळिराजाला व शेतीला नक्कीच अच्छे दिन येण्याचे संकेत आहेत.
सध्या मान्सूनपूर्व खरिपांच्या पिकांसाठी मशागती झाल्या असून काही शेतकऱ्यांनी रोहिणी नक्षत्रापूर्वीच पेरण्यांचा श्रीगणेशा केला आहे. यंदा कडाक्याच्या उन्हामुळे पावसाळी हंगामही जोरदार राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे आता बळीराजा खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. मागील वर्षीपासून ऊसशेती तोट्यात गेल्याने आता शेतकऱ्यांनी उसाच्या शेतीकडे पाठ फिरविली आहे. पर्यायाने राहुरी तालुक्यात बहुतांश ठिकाणी उसाचे क्षेत्र घटले असून यदा कपाशीच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याचे चिन्ह आहेत.