थर्टी फर्स्टच्या निमित्ताने भंडारदरा परिसरात येणार्‍यांवर राजूर पोलिसांची करडी नजर

थर्टी फर्स्टच्या निमित्ताने भंडारदरा परिसरात येणार्‍यांवर राजूर पोलिसांची करडी नजर

अकोले |प्रतिनिधी| Akole

नविन वर्षाच्या स्वागतासाठी भंडारदरा येथे होणार्‍या संभाव्य गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राजूर पोलीस व वनविभागाच्यावतीने भंडारदरा येथे नुकतीच बैठक संपन्न झाली असून थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर रात्री पर्यटकांवर राजूर पोलिसांची करडी नजर असणार आहे.

अकोले तालुक्यातील भंडारदरा हे महत्त्वाचे निसर्ग पर्यटन स्थळ असून नविन वर्षाच्या स्वागतासाठी भंडारदरा येथे मोठ्या प्रमाणात दरवर्षी गर्दी होत असते. परंतु कोविडच्या कालावधीत भंडारदरा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्यामुळे दोन वर्ष भंडारदर्‍यात पर्यटकांची गर्दी झाली नव्हती. पंरतु यावर्षी मात्र कोविडचे सर्व नियम पाळून भंडारदरा पर्यटनास परवानगी देण्यात आल्यामुळे भंडारदर्‍याला मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या गर्दीवर अंकुश मिळविण्यासाठी राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे व वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी गणेश रणदिवे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक संपन्न झाली.

भंडारदर्‍याचे कापडी तंबुचे कॅम्पिंग पर्यटकांसाठी खास आकर्षण असून थर्टी फस्टसाठी सर्वात जास्त पसंती पर्यटक कॅम्पिंगसाठी देत असतात. मात्र टेंट धारकांनी तंबुमध्ये वास्तव्यास येणार्‍या पर्यटकांची नोंद घेणे महत्त्वाचे असल्याने पर्यटकांचे आय डी प्रुफ, मोबाईल नंबर, वाहन नंबर नोंदवहीत घेणे आवश्यक आहे. टेंट साईडवर रात्री नऊ वाजेनंतर म्युझिक वाजविण्यास बंदी घालण्यात आली असून भंडारदरा पर्यटनास गालबोट लागणार नाही याची टेंट धारकांनी काळजी घ्यावी.

वनविभागाच्या वतीनेही टेंटधारकासाठी महत्त्वपूर्ण सूचना सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी गणेश रणदिवे यांनी दिल्या असून पर्यटकांसाठी शेकोटी करताना टेंटधारकांनी काळजी घ्यावी. साऊंड सिस्टीमचा वापर करताना आवाज मर्यादीत असावा. स्वच्छतेची काळजी घ्यावी. पर्यटकांच्या वस्तुची व पर्यटकांची सुरक्षा ही महत्त्वाची असून टेंट धारकांची ती जबाबदारी राहील.पर्यटकांना रात्रीच्या वेळेस जंगलात फिरू देऊ नये, नियमांचे पालन न करणार्‍यांवर कायदेशिर कारवाईचा इशारा दोन्ही विभागांनी दिली आहे.

भंडारदरा धरणाचे पर्यटन कोविडच्या कालावधीत रोखले गेले होते. त्यामुळे स्थानिक तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न तयार झाला होता. त्यामुळे दोन्ही विभागांनी रोजगार निर्मितीस प्राधान्य देत प्रत्येक पर्यटकांस तंबूमध्ये वास्तव्यासाठी कमीत कमी प्रत्येकी एक हजार रुपये मोजावे लागणार असून त्यासंदर्भात वनविभागाने एक नियमावली टेंटधारकासांठी ठरवून दिली आहे.

भंडारदर्‍याला थर्टी फर्स्टच्या रात्री पर्यटकांच्या गर्दीचा आढावा राजूर पोलिसांनी घेतला असून जास्तीचा पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com