अहमदनगर/शेवगाव (प्रतिनिधी) -

करोना संसर्गाच्या धर्तीवर जिल्हा परिषदेने खरेदी करून ग्रामपंचायतींना पाठवण्यात आलेल्या अर्सेनिक अल्बम-30 या गोळ्यांचे डबीत पातळ द्रव निघाल्याचा

धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेवगाव तालुक्यातील वाघोली ग्रामपंचायतने पंचायत समितीकडून आणलेल्या ‘त्या’ गोळ्या बाबत संशय निर्माण झाला असून दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यावर नागरिकांनी गोळ्या घेण्यास विरोध दर्शवत संताप व्यक्त केला. जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांच्या तालुक्यात हा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने सरकारच्या आदेशानुसार ग्रामपंचायतीच्या 14 वित्त आयोगाच्या रकमेवरील व्याज जमा करुन घेतले होते. या रक्कमेतून ग्रामपंचायतला रोग प्रतिकारशक्ती वाढवणार्या अर्सेनिक अल्बम-30 गोळ्या पाठवणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने सुमन होमिओ फार्मसी, पुणे या कंपनीमार्फत शेवगाव पंचायत समितीला तालुक्यातील ग्रामपंचायतींना वाटाण्यासाठी प्लास्टिक पिशव्यात अर्सेनिक अल्बम-30 या गोळ्यांच्या डब्या पाठवल्या. पंचायत समिती प्रशासनाने तालुक्यातील ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक, सरपंचांना त्या गोळ्या घेऊन जाण्यास सांगितले. त्यानुसार तालुक्यातील वाघोली ग्रामपंचायतचे चतुर्थश्रेणी कर्मचारी बबन बोरुडे यांनी 31 डिसेंबर रोजी पंचायत समितीमधून गोळ्यांचे पाकीट आणले.

दरम्यान शनिवार ( दि.2 ) रोजी ग्रामपंचायतचे सरपंच व अन्य कर्मचार्यांनी आशा सेविकांच्या मार्फत गोळ्या वाटप करण्यास सुरवात करतांना गोळ्यांच्या डब्या असणारे पाकीट फोडले, त्यावेळी भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष उमेश भलसिंग यांना डबीत गोळ्या नसून पातळ द्रव (घट पाणी) असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अन्य डब्या तपासल्या असता बहुतांश डब्यात पातळ पाण्यासारखा द्रव तर काही डब्यात साखरे पाक सारखा दिसणारा द्रव तर काही डब्यात घट्ट झालेला पांढरा द्रव पदार्थ दिसून आला. याबाबत भलसिंग यांनी काही वैद्यकीय क्षेत्रातील मित्रांना याबाबत फोन करुन कळवले असता, त्यांनी त्या गोळ्या घेऊ नका असा सल्ला दिला. दरम्यान ही बाब ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांच्यामार्फत वरिष्ठ पातळीवर गेली असता त्यांना मतेफ पाकिटे पुन्हा आणावे यासाठी सांगितले गेले.

आर्सेनिक अल्बम -30 गोळ्यांचा पुरवठा करण्यात आला. सदर गोळ्या जिल्हा परिषद करिता सुमन होमिओ फार्मसी, पुणे यांनी पुरवठा केल्या आहेत. मात्र त्या डब्यात गोळ्या ऐवजी पाणी, तसेच घट्ट झालेला पांढरा द्रव पदार्थ मिळून आला. या मुळे गोळ्यांच्या दर्जा बाबत शंका उपस्थित झाल्या आहेत.

वाघोली ग्रामपंचायने गावातील नागरिकांसाठी वाटप करण्यासाठी आणलेल्या 14 पाकिटातील डब्या उघडल्या असता हा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष बाब म्हणजे जिल्हा परिषदेच्या खात्यावर तब्बल पाच महिन्यांपूर्वी 1 लाख 48 हजार 760 रुपये इतकी रक्कम सदर गोळ्यासाठी जमा केली होती. वाघोली ग्रामपंचायतच्या 2 हजार 903 लोकसंख्येच्या गावात 14 पाकिटं पाठवण्यात आली.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 14 तालुक्यात अर्सेनिक अल्बम-30 या गोळ्यांचे वाटप करण्यात येत आहे. या गोळ्याबाबत पहिली तक्रार शेवगाव तालुक्यातील एका गावातून आलेली असून या तक्रारीसह जिल्ह्यात असा प्रकार अन्यत्र घडलेला आहे, याची चौकशी करणार आहोत.

राजेंद्र क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद.