पुणतांब्यात सोनाराचे दुकान चोरट्यांनी फोडले

मुख्य बाजारपेठेतील घटना; साठ हजाराचा ऐवज लंपास
पुणतांब्यात सोनाराचे दुकान चोरट्यांनी फोडले

पुणतांबा (वार्ताहर) / Puntamba - गावातील मुख्य बाजारपेठेत अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असलेले महेश अरुण मैड यांच्या मालकीचे योगेश अंलकार गृह हे सोन्याचे दुकान रविवारी रात्री अंदाजे दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान फोडून चोरट्यांनी अंदाजे 60 हजाराचा ऐवज लंपास केला.

रविवारी रात्री चार ते पाच चोरट्यांनी दुकानाचा लाकडी व लोखंडी दरवाजा फोडून आतमध्ये प्रवेश केला. दुकानातील अंदाजे दीडशे ग्रॅम चांदी 7 ते 8 ग्रॅम सोनेचांदीच्या तोरड्या, जोडवे, सोन्याची मुर्णी तसेच दुरुस्तीसाठी आलेले दागिने घेऊन पोबारा केला. दुकानातील लोखंडी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न मात्र असफल झाला. तोंडाला मास्क लावलेले तसेच अंगात जॅकेट घातलेले चार ते पाच चोरटे सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसून आले आहे. सकाळी दुकानात चोरी झाल्याचे लक्षात येताच श्री. मैड यांनी तातडीने पुणतांबा पोलीस स्टेशनला संपर्क साधला. पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. मंडलिक यांनी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

पुणतांब्याच्या मध्यवर्ती बाजारपेठेत चोरट्यांनी धाडसी चोरी केल्यामुळे ग्रामस्थ व व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरण पसरले आहे. गावात गेल्या काही दिवसापासून चोरीचे सत्र सुरु झाले आहे. आतापर्यंत एका चोरीचा तपास लागलेला नाही त्यामुळे ग्रामस्थात तीव्र नाराजी आहे. गावात सध्या सर्वच प्रकारच्या अवैध धंद्यांनी चांगलाच जम बसविला आहे. चोरट्यांनी सुद्धा चोरीचे सत्र सुरु केले आहे. मात्र पोलीस यंत्रणा अत्यंत सुस्त असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये पोलीस स्टेशनच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी आहे. चोर्‍यांचा तातडीने तपास लावावा, येथील पोलीस स्टेशनला पोलिसांची संख्या वाढवावी तसेच रात्रीची गस्त सुरु करावी, अशी ग्रामस्थांकडून मागणी केली जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com