पोलीस कर्मचार्‍यांचा एलसीबीत जीव गुंतला...

16 कर्मचार्‍यांवर बदलीची टांगती तलवार
पोलीस कर्मचार्‍यांचा एलसीबीत जीव गुंतला...

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar - राज्य शासनाने 31 जुलैच्या आत सर्व बदल्या करण्याचे आदेश दिले असल्याने जिल्हा पोलीस दलात बदल्याचे वारे वाहू लागले आहे. कायमच चर्चेत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेमधील काही कर्मचारी वर्षानुवर्षे याच ठिकाणी ठाण मांडून बसलेली आहेत. त्यातील काही कर्मचार्‍यांनी स्थानिक गुन्हे शाखा व त्याअंतर्गत येणार्‍या इतर उपशाखांचा आधार घेत बदली दाखवली आहे.

नियमानुसार एकाच ठिकाणी केवळ पाच वर्षे नोकरी बंधनकारक असताना नियमबाह्यपणे वर्षानुवर्षे राहणार्‍या स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिसांच्या पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तात्काळ बदल्या कराव्यात, अशी मागणी होत आहे. दरम्यान पोलीस कर्मचार्‍यांचा वर्षानुवर्षे एलसीबीतच जीव गुंतल्याने चर्चेला पेव फुटले आहे.

कोविडमुळे 30 जूनपर्यंत सर्व प्रकारच्या बदल्या स्थागित ठेवण्याचे आदेश शासनाने काढले होते. परंतु, आता 31 जुलैपर्यंत सर्व बदल्या करण्याचे आदेश नव्याने काढल्याने जिल्हा पोलीस दलात बदल्यांबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून एकाच पोलीस ठाण्यात कार्यरत असणार्‍या जिल्ह्यातील 180 पोलीस कर्मचार्‍यांची यादी यापूर्वीच तयार करण्यात आली होती.

या कर्मचार्‍यांनी बदलीबाबत अर्ज करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले आहेत. यावर प्रक्रीया सुरू करण्यात आली असून येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये या प्रशासकीय बदल्या केल्या जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यातील पोलीस ठाणे, पोलीस मुख्यालय, स्थानिक गुन्हे शाखेत पाच वर्षांचा कालावधी संपुष्टात येऊनही त्याचठिकाणी काही पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. विशेष करून स्थानिक गुन्हे शाखेमध्ये पाच वर्षांचा कालावधी संपुष्टात येऊनही तेथेच असलेल्या 16 कर्मचार्‍यांचा यामध्ये समावेश आहे. या कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्यास त्याठिकाणी नवीन पोलीस कर्मचार्‍यांना काम करण्याची संधी मिळणार आहे.

तत्कालिन वरिष्ठांच्या आशिर्वादाने स्थानिक गुन्हे शाखेमध्ये काहींनी मुदतवाढ घेतली आहे. यासाठी त्यांनी गुन्हे शाखेअंतर्गत येणार्‍या इतर उपशाखांचा आधार घेतला आहे. याठिकाणी वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या पोलिसांची बदली होणार का? याची चर्चा जिल्हा पोलीस दलात रंगली आहे.

मुदत संपलेले 16 कर्मचारी

सहायक फौजदार सुनील गायकवाड, पोलीस हवालदार दत्तात्रय हिंगडे, सखाराम मोटे, पोलीस नाईक सुनील चव्हाण, संदीप पवार, विशाल दळवी, रविकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, पोलीस शिपाई योगेश सातपुते, किरण जाधव, मच्छिंद्र बर्डे, रोहीदास नवगिरे, विनोद मासाळकर, विजय धनेधर, सागर सुलाणे, रोहित मिसाळ.

अनेक इच्छुक, पण...

पोलीस दलातील महत्त्वाची शाखा असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेमध्ये येण्यासाठी अनेक कर्मचारी इच्छुक आहेत. अनेकांनी एलसीबीत नियुक्ती मिळविण्यासाठी अर्ज केले आहेत. आपली बदली एलसीबीत व्हावी यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु, वर्षानुवर्षे त्याच ठिकाणी असलेल्या कर्मचार्‍यांमुळे पोलीस दलात चांगले काम करणार्‍यांना एलसीबीत नियुक्ती मिळत नाही, अशी खंत काही पोलिसांनी व्यक्त केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com