देशात लोकशाही संपुष्टात येण्याची लक्षणे दिसत आहेत : आ. थोरात

आ. बाळासाहेब थोरात
आ. बाळासाहेब थोरात

अहमदनगर (प्रतिनिधी)

उद्योजक अदानी यांना 20 हजार कोटी रुपये कोठून व कसे मिळाले ? आणि अदानी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध काय?, असे फक्त दोनच प्रश्न काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विचारले असताना भाजप त्याची उत्तरे का देत नाही?, असा सवाल माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारीत नगर येथे केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ख़ासदारकी रद्द करण्याबाबत घेतलेल्या निर्णराच्या निषेधासह देशात भविष्यात लोकशाही राहील की नाही अशी स्थिती आहे. सरकारच्या दडपशाही विरोधात जनजागृतीसाठी 30 एप्रिलपर्यंत गावपातळीपासून देशपातळीपर्यंत काँग्रेस आंदोलने करणार आहे, अशी घोषणाही आ. थोरात यांनी केली.

राहुल गांधी यांनी परदेशात भारताची बदनामी केल्याचा दावा करून भाजपने त्यांच्याविरुद्ध आंदोलने सुरू केली आहेत. तर दुसरीकडे राहुल गांधींना संसदेत बोलू दिले जात नाही व यांनी खासदारकी रद्द करून यांना घरही खाली करण्यास सांगितल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय काँग्रेसने एप्रिल महिनाभर आंदोलने करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनांतर्गत आयोजित पत्रकार परिषदेत आ. थोरात यांनी भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी श्रीरामपूरचे आ. लहू कानडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्रातील भाजप सरकारद्वारे सूडबुद्धीने वागत असल्याचे म्हणण्यापेक्षा लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्वसामान्यांचा आवाज आतापर्यंत दाबला गेला आहे व आता विरोधातील नेत्याचेही आवाज दाबले जात आहेत व हे निरोगी लोकशाहीचे लक्षण नाही, असा दावा करून आ. थोरात म्हणाले, देशातील लोकशाही संपण्याच्या दिशेने जात असल्याने याचा अर्थ देशात हुकूमशाही नाही तर काय आहे? देशातील घडामोडींमुळे जनतेला काळजी पडली आहे. देशातील लोकशाही कशी पुढे जाणार, असा त्यांचा प्रश्‍न आहे. राहुलजींनी कन्याकुमारी ते काश्मीर साडेतीन हजार किलोमीटरची पदरात्रा काढून वाढती महागाई व बेरोजगारीसह सत्ताधारी भाजपच्या तत्वज्ञानाविरोधात जागृती केली आहे. त्यामुळे त्यांची ही भूमिका तसेच वाढती महागाई व बेरोजगारी, अवकाळी नुकसानीची मदत, कांदा अनुदानातील जाचक अटी व अन्र मुद्दे गावा-गावांतून काँग्रेसद्वारे मांडले जाणार आहे, असेही थोरात रांनी स्पष्ट केले.

उत्तर देऊ दिले नाही

राहुलजींनी परदेशात भारताची बदनामी केल्याचा दावा भाजपद्वारे केला जातोे, पण याला उत्तर संसदेत देण्याची तयारी राहुलजींची होती. पण त्यांना बोलू दिले नाही. उलट, त्यांचे बोलणे व काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची संसदेतील भाषणे वगळली गेली आहेत, असा दावा करून आ. थोरात म्हणाले, बोलू द्यावे म्हणून राहुलजी सभापतींनाही भेटले होते. त्यांनी उत्तर दिले असते तर नंतर ते चूक की बरोबर ठरले असते. पण राहुलजी बोलत असताना सत्ताधाऱ्यांनीच गोंधळ घातला. तसेच गुजरातची केस पुन्हा सुरू करून लगेच निकाल देऊन एकाच दिवसात राहुलजींची खासदारकी काढून घेतली गेली आहे. जो विरोधी बोलेल त्याचा आवाज दाबण्याचा ईडी, सीबीआर वा अन्न मार्गाने प्रयत्न होतो आहे व जे भाजपमध्ये प्रवेश करतात, ते सर्व संपन्न होतात, असे दिसत आहे, अशी टीकाही थोरात यांनी केली. दरम्यान, काँग्रेसने महिनाभर आयोजित केलेल्या आंदोलनांना महाविकास आघाडीतील मित्रांना जोडून घेण्याचा प्रयत्न आहे, असेही थोरातांनी स्पष्ट केले. छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे, पण येत्या 2 एप्रिलला तेथे महाविकास आघाडीची महासभा होणार आहे व तिच्यात विघ्न येऊ नये, हे पाहण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, असेही आ. थोरातांनी स्पष्ट केले.

जिल्हा बँकेत अयोग्य घडले

जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जे घडले, ते अयोग्य आहे. जिल्ह्यातील वडिलधाऱ्या नेत्यांनी या बँकेची काळजी घेतली आहे व आम्हीही त्याच पावलावर पाऊल ठेवून चाललो आहोत. जिल्हा बँक संपली तर सहकारी संस्था व शेतकरी अडचणीत आल्याची अनेक उदाहरणे आहेत. जिल्हा बँक ही मातृसंस्था असल्याने कायम सक्षम राहिली पाहिजे. ती कोणाच्या ताब्यात आहे, हे दुय्यम आहे. पण संस्था जगली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे, असे भाष्य आ. थोरात यांनी केले.

दरम्यान, सर्वात जास्त पण प्रेमाची दहशत संगमनेरमध्ये आहे. दहशत अनेक प्रकारची असते. पण कार्यपद्धती चुकीची नसावी, असा सूचक टोला महसूल मंत्री राधाकृष्ण विखेंना लगावून थोरात म्हणाले, त्यांनी नवीन वाळू धोरण आणल्याचे म्हणतात, ते लवकर चालू व्हावे. घरपोहोच देणार म्हणतात, त्यामुळे वाटल्यास आम्ही त्यांच्याकडे वाळू आणायला जाऊ. पण वाळूमुळे विकास कामे थांबता कामा नयेत, असेही भाष्य आ. थोरातांनी केले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com