देवळाली प्रवरात सहा वर्गखोल्या फोडून साहित्याची चोरी

शाळेच्या मैदानावर दारूच्या बाटल्यांचा खच ; पोलिसांचे दुर्लक्ष
देवळाली प्रवरात सहा वर्गखोल्या फोडून साहित्याची चोरी
चोरी

देवळाली प्रवरा (वार्ताहर) - येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहा वर्गखोल्यांचे दगडाच्या साह्याने दरवाजे तोडून सहा खोल्यातील इलेक्ट्रिक फॅन व खुर्च्यासह इतर साहित्य असे 20 हजार रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरुन नेला. लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने शाळेच्या मैदानावर तळिरामांनी उच्छाद मांडला आहे.

मैदानावर दारुच्या रिकाम्या व फोडलेल्या अवस्थेतील बाटल्यांचा खच पडला आहे. मैदानात कोठेही पाहिले तर दारुच्या बाटल्याच दिसतात. या तळिरामांकडे पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. विद्येचे माहेरघर अक्षरशः दारु अड्डा झाला आहे. ज्या जागेत विद्या आत्मसात केली जाते, त्याच ठिकाणी तळीराम आज बाटल्या रिचवत असल्याचे विचित्र दृश्य निर्माण झाले आहे.

येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरवारी मध्यरात्री ते शुक्रवारी पहाटेपर्यंत अज्ञात चोरट्याने शाळेच्या वर्ग खोल्यांच्या दरवाजावर मोठ मोठे दगड टाकून दरवाजे तोडून वर्गातील सिलिंग फॅन व इलेक्ट्रिक वस्तू, खुर्च्या इतर साहित्य असे एकूण 20 हजार रुपयांच्या वस्तू अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्या व वर्ग खोल्यातील इतर साहित्याची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. दरवाजे दगडाच्या साह्याने तोडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना एका पत्रकाराने चोरीची माहिती दिली असता त्यांनी तात्काळ पो.हे.कॉ.संजय पठारे यांना घटनास्थळी जाण्यास सांगितले.परंतु पठारे घटनास्थळी न येता पो.कॉ.गणेश फाटक यांना पाठवून फिर्याद देण्यासाठी राहुरी पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. देवळाली प्रवरात दूरक्षेत्र असून अडचण नसून खोळंबा, अशी अवस्था सध्या आहे.अवघे दोन पोलीस कर्मचारी या पोलीस चौकीत येत असतात. सध्या त्यांचीही राहुरी पोलीस ठाण्यात नेमणूक असल्याने संध्याकाळी येऊन तासभर पोलीस चौकीवर ते थांबताना दिसत आहेत.

जिल्हा परिषद मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका मंगल पठारे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने शाळेच्या मैदानावर तळिरामांनी उच्छाद मांडला आहे. पोलिसांची गस्त नसल्यामुळे तळिरामांचे फावत आहे. सायंकाळी तळिरामांची शाळेच्या मैदानावर जत्रा भरते आहे. वेळीच बंदोबस्त न झाल्यास तळीराम दिवसा ढवळ्या दारुचा अड्डा बनवतील. याबाबत शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन तळिरामांचा बंदोबस्त करण्याची मागणी करणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com