
एकरूखे (वार्ताहर) - राहाता तालुक्यातील एकरूखे येथील चोरट्यांनी किचनच्या दरवाजाची कडी खोलून पाच तोळे सोने व 5 हजार रोख असा मुद्देमाल लंपास केला, अशी फिर्याद काशिनाथ दगडू घनघाव यांनी राहाता पोलीस स्टेशनला दिली.
काशिनाथ घनघाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांकडून याअगोदर तीन घरांचे दरवाजे खोलण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु घरातील लोक जागे झाले असताना तिथून पळता आले. त्यानंतर एकरूखे-रामपुरवाडी येथे घनघाव वस्तीवर चोरट्यांनी किचनचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममध्ये असलेल्या कपाटातून तीन तोळे वजनाची पोत व एक तोळे अंगठी व एक तोळ्याची कर्णफुले असा ऐवज लंपास केला व रोख 5 हजार अशा रोख रकमेसह पलायन केले.
आजच्या किंमतीत 2.50 लाखाचे सोने लंपास केले आहे. एकरुखे परिसरात चोरीचे प्रमाण वाढत असल्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.
या चोरीचा तपास राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली बाबा सांगळे करत आहेत.