
अहमदनगर |सचिन दसपुते| Ahmednagar
चोरी, घरफोडी तसेच जबरी चोरी गुन्ह्याच्या तपासात जिल्हा पोलीस दल फारच मागे असल्याचे गेल्या वर्षीच्या आकडेवारीवरून दिसून येते. 2022 मध्ये जिल्ह्यात पाच हजार 214 दाखल गुन्ह्यापैकी फक्त एक हजार 379 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून तब्बल तीन हजार 835 गुन्ह्यांचा तपास लागलेला नाही. चोरी, घरफोडी किंवा जबरी चोरी झाल्यानंतर नागरिकांकडून पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यांचा तपास होईलच याची शाश्वती नसलेल्या चर्चेला यामुळे पुष्टी मिळाली आहे.
सर्वसामान्य नागरिकांचे पैसे, सोने-चांदी, मौल्यवान वस्तू चोरीला गेल्यानंतर पोलिसांत फिर्याद दिल्यास त्याचा तपासच केला जात नाही, अशी एक चर्चा सतत झडत असते. त्यामुळे कधी कधी चोरी, घरफोडीच्या घटनेचा गुन्हा दाखल करण्यास नागरिक टाळतात. खरचं तसं होत असेल का? याबाबतची शंका गेल्या वर्षीच्या आकडेवारीवरून येते. वर्षभरात जिल्ह्यात चार हजार 43 चोरीच्या घटना घडल्या. यासंबंधी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. त्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी तपासी अधिकारी नियुक्त केले गेले. परंतू वर्षभरात केवळ 983 घटनांचा तपास लागला आहे. अद्यापही तीन हजार 60 चोरीच्या गुन्ह्यांचा तपास लागलेला नाही.
रात्री व दिवसा चोरट्यांकडून घरे फोडली जातात. घरातील पैसे, दागिने, मौल्यवान वस्तूंची चोरी केली जाते. खासकरून बंद घरे चोरट्यांकडून लक्ष केली जात असल्याचे दिसून येत आहे. वर्षभरात घरफोडीच्या 829 घटना घडल्या आहेत. त्यातील 185 घटनांचा तपास लागला आहे. अजून 644 घरफोडी गुन्ह्यांचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. महिलांच्या गळ्यातील दागिने बळजबरीने चोरने, वाहन चालकास रस्त्यात गाठून हत्यारांचा धाक दाखवून त्याच्याकडील पैसे, दागिने, वस्तू काढून घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला जातो. वर्षभरात असे 342 गुन्हे संबंधीत पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. यातील 211 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीस दलाला यश आले आहे. 131 गुन्ह्यांचा तपास केला जात आहे.
चोरीची घटना घडल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांकडून त्याचा तपास व्हावा व आपली गेलेली वस्तू आपल्याला मिळावी अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना असते. पोलीस त्यासाठी प्रयत्नही करतात. परंतू गेल्या वर्षीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास खरच पोलीस अशा गुन्ह्यांचा तपास प्रमाणिकपणे करत असतील का? याची शंका येते.
दरोड्याला प्राधान्य
पाच पेक्षा जास्त चोरट्यांचा सहभाग असलेल्या टोळीने सशस्त्र धुमाकूळ घालून ऐवज लुटला तर दरोड्याचा गुन्हा दाखल केला जातो. वर्षभरात जिल्ह्याचा विविध भागात असे 36 दरोडे पडले. त्यातील 34 दरोड्याचे गुन्हे उघडकीस आणून दरोडेखोरांना अटक केली आहे. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. दरम्यान टोळी करून सशस्त्र दरोड्याच्या तयारीत असलेल्या 28 टोळ्यांच्या मुसक्या आवळ्यात पोलिसांना यश आले आहे. फसवणुकीचे 110 गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. त्यातील 99 गुन्हे पोलिसांनी उघड केले आहेत. 11 गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.
कामाचा ताण अन् तपास
पोलीस ठाण्यात एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या गुन्ह्याचे स्वरूप पाहून तो संबंधी पोलीस अंमलदार, अधिकार्यांकडे तपासासाठी दिला जातो. त्या गुन्ह्यांचा तपास करत असताना सण, उत्सव, राजकीस नेत्यांचे दौरे, आंदोलने, निवडणुक बंदोबस्ताचा ताणही पोलिसांवर असतो. त्यामुळे तपासाला म्हणावा तेवढा वेळ त्यांना देता येत नाही. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे एका अधिकारी, अंमलदारांकडे अनेक गुन्हे असतात. याचाही परिणाम तपासकामावर होत असल्याचे पोलिसांच्या चर्चेतून लक्ष्यात आले आहे.