तरुणाने चक्क बिबट्याच्या तोंडातून बकरी ओढली!

उक्कलगावातील थरार
तरुणाने चक्क बिबट्याच्या तोंडातून बकरी ओढली!

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

बिबट्याच्या दहशतीचे सावट उक्कलगावकरांवर कायम असून रोज कुठे ना कुठे बिबट्या दृष्टीस पडत आहे. त्यातच मंगळवारी संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान उक्कलगाव खंडाळा रोडवरील शिंदे वस्तीवर बिबट्याने हल्ला करून संभाजी शिंदे यांची शेळी ओढून नेत असताना त्यांचा मुलगा अतुल संभाजी शिंदे याने प्रसंगावधान राखून बिबट्याच्या जबड्यातून शेळी ओढत तिचे प्राण वाचवल्याने त्याच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

सायंकाळी सातच्या सुमारास या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. पटेलवाडी व इतर वाड्या वस्त्यांवरील दूध उत्पादक शेतकरी डेअरीला दूध घालण्याच्या निमित्ताने या रसत्यावरूनच वावरतात.डांबरी रस्त्यालगतच शिंदे यांची वस्ती असल्याने भर लोकवस्तीत बिबट्याने हल्ला केल्याचे समजताच परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.ज्यावेळी बिबट्याने हल्ला केला त्यावेळी लाईट गेलेली असल्यामुळे सर्वत्र अंधार होता. शेळीच्या ओरडण्याने अतुल शिंदे यांनी वाडग्याकडे धाव घेतली असता शेळीवर हल्ला झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.मात्र कुत्रा समजून त्यांनी चक्क बिबट्याचा पाठलाग करत त्याच्या तावडीतून शेळीची सुटका केली. आपण चक्क बिबट्याच्या जबड्यातून शेळी ओढल्याचे समजताच अतुल याचीही पाचावर धारण बसली.

जखमी शेळीवर प्रथमोपचार करण्यात आले असून वनाधिकार्‍यांशी पंचनाम्याबाबत संपर्क साधण्यात आला आहे. मात्र काल उशीरापर्यंत पंचनामा करण्यात आला नसल्याचे समजते. दरम्यान या भागात अजूनही उसाचे मोठे क्षेत्र असून बिबट्याला लपण्यासाठी जागा आहे.त्यामुळे या भागात पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी होऊ लागली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com