पाणी उशाला न कोरड घशाला...

पाणी पट्टी थकली; पाच गावांचा नळ पाणी पुरवठा बंद
पाणी उशाला न कोरड घशाला...

भेंडा l वार्ताहर l Bhenda

नळ पाणी पट्टी थकबाकी न भरल्याने पाणी व्यवस्थापन समितीने भेंडा, कुकाणा सह पाच गावांचा पाणी पुरवठा बंद केला आहे. ऐन पावसाळ्यात महापूर येत असताना पाच गावातील जनतेला पाच दिवसांपासून पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने पाणी उशाला न कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील भेंडा-कुकणा व इतर सहा गावची प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना आहे.भेंडा बुद्रुक,भेंडा खुर्द,कुकणा,तरवडी,चिलेखनवाडी व अंतरलवाली या सहा गांवासाठीची ही सामुदायिक नळ पाणी पुरवठा योजना आहे.

राज्यातील युती शासनाचे काळात तत्कालिन काँग्रेसचे आमदार पांडुरंग अभंग यांनी १९९७-९८ मध्ये ८६७.३८ लाख रुपये खर्चची योजनेस मंजुरी मिळविली होती.

ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते मारुतराव घुले पाटील यांनी महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट,गावातील पाणी टंचाई लक्षात घेऊन या योजनेसाठी मोठ्या मनाने कारखाना मालकीची 18 एकर जमीन दिली.

1991च्या जनगणने नुसार 20334 व्यक्ती तर 2030 ची प्रकल्पित लोकसंख्या 44000 व्यक्ती गृहित धरून दरदिवशी प्रतिमाणूस 55 लिटर शुद्ध पिण्याचे पाणी मिळेल या क्षमतेची पाणी योजना हाती घेतली.

निधी अभावी बऱ्याच कालावधी पर्यंत रखडली होती.राज्यात आघाडी सरकार सत्तेत आल्यावर राष्ट्रवादीचे तत्कालिन आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी या योजनेस 2099-10 मध्ये 2812.00 लाखाची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून हि योजना पूर्ण करून कार्यानवयित केल्याने वरील सहा गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सोडवण्यास मदत झाली. मुळा धरणाच्या उजव्या कालव्याच्या उदभव धरून हि योजना उभी राहिलेली आहे.सहा गावांना दोन महिने पुरेल इतके पाणी साठवण्यासाठी 260 दशलक्ष लिटर क्षमतेचा सिमेंट काँक्रिट चा पाणी साठवन तलावाची व्यवस्था असून शुद्धीकरण प्रकल्प आहे.

ही योजना कार्यन्वयीत झाल्या पासून भेंडा येथील प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेतून भेंडा बुद्रुक, भेंडा खुर्द, कुकाणा, तरवडी, चिलेखनवाडी व अंतरवाली या 6 गावांना नळाद्वारे पिण्याचे शुद्ध पाणी मिळत आहे.

मुळा काळव्यातून पाणी योजनेच्या तलावात पाणी येण्यास उशीर झाला तरच कधी तरी चार-पाच दिवसांचा पाणी पुरवठा खंडित झाला असेल.

मात्र यावेळी भेंडा बुद्रुक, भेंडा खुर्द,कुकाणा,तरवडी,चिलेखनवाडी या 5 गावांच्या ग्रामपंचायतीनी सन 2019-20 या आर्थिक वर्षातील सुमारे 30 लाख रुपयांची पाणी पट्टी थकलेली असल्याने संत ज्ञानेश्वर संयुक्त पाणी व्यवस्थापन समितीने दि.18 सप्टेंबर पासून या थकबाकीदार गावांचा पाणी पुरवठा बंद केलेला आहे.

नळ पाणी पुरवठा बंद केल्याने थकबाकीदारां बरोबरच पाणी पट्टी नियमित भरणाऱ्या पाणी मिळत नाही.त्यामुळे सरसकट पाणी बंद न करता जे पट्टी भरत नाही त्यांचे वैयक्तिक नळ जोड तोडून पाणी पुरवठा बंद करावा व प्रमाणिक करदात्यांना तातडीने पाणी पुरवठा सुरू करावा अशी मागणी होत आहे.

2016,2017,2018 आणि 2019 मध्ये दुष्काळामुळे नेवासा तालुक्यात पिण्याची पाणी टंचाई निर्माण झालेली असताना याच भेंडा पाणी पुरवठा योजनेमधून टँकर व्दारे अर्ध्या तालुक्याला पिण्याचे पाणी पुरविण्यात आले होते.आणि आता पाण्याचे महापूर सुरू असताना जनतेला 5 दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नाही याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.पाणी योजनेचा तलाव पाण्याचे काटोकाठ भरलेला असतांना पाच गावांच्या जनतेच्या घरातील हंडे मात्र रिकामे आहेत.

पाणी व्यवस्थापन समिती ग्रामपंचायतींवर तर ग्रामपंचायती कोरोना आणि नागरिकांवर थकबाकीचे खापर फोडत बसली आहे.ज्या उद्देशाने लोकनेते मारुतराव घुले पाटील यांनी ही पाणी योजना सुरू केली त्या उदेशालाच हरताळ फसला जात आहे अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

भेंडा बुद्रुक, भेंडा खुर्द,कुकाणा,तरवडी व चिलेखनवाडी या 5 ग्रामपंचायतींकडे सुमारे 30 लाखांची पाणी पट्टी थकबाकी आहे.ही थकबाकी न भरल्याने व्यस्थापन समितीला पाटबंधारे खात्याची पाणी पट्टी,वीज बिल,कामगार पगार,पाणी योजनेची देखभाल दुरुस्ती, पाणी शुद्धीकरण खर्च करणे अवघड झालेले आहे.त्यामुळे नाईलाजाने पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.

दौलत देशमुख (अध्यक्ष,ज्ञानेश्वर संयुक्त पाणी व्यवस्थापन समिती)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com