
शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi
सह्याद्री घाटमाथ्याचें समुद्राला वाहून जाणारे पाणी अडवून ते पूर्वेस वळविण्यासाठी निळवंडे धरण क्षेत्रातील सात आमदारांना राजकारण विरहित सोबत घेऊन याबाबतची भूमिका केंद्र व राज्य सरकारकडे मांडून येथील पाणी प्रश्न प्रामाणिकपणे सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन खा. सदाशिव लोखंडे यांनी केले.
रविवार दि 10 जुुुलै रोजी निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या वतीने निळवंडे धरण लाभधारक शेतकर्यांची बैठक शिर्डीत पार पडली. याप्रसंगी जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त अभियंता डी. पी. थोरात, जलतज्ञ डॉ. साईनाथ आहेर, सरपंच जनार्दन घोगरे, शेतकरी संघटनेचे सुरेश ताके, शिवसेनेचे कमलाकर कोते, धनंजय गाडेकर, प्रमोद लबडे, दत्ता भालेराव, निळवंडे पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके, उत्तमराव घोरपडे, सचिव विठ्ठल घोरपडे, राजेंद्र सोनवणे, सुखलाल गांगवे आदींसह निळवंडे लाभधारक शेतकरी उपस्थित होते.
खा लोखंडे म्हणाले की, साईबाबांच्या आशीर्वादाने निळवंडे धरणाचे कालवे व कामासाठी राज्य व केंद्र सरकारच्या अनेक मंत्र्यांनी सहकार्य केले असून अनेक अडथळे दूर झाले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी निळवंडे काम संदर्भातील अनेक अडचणी दूर करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. जल आयोगाची मान्यता मिळवून दिल्याने नाबार्डसह इतर ठिकाणाहून कर्जरुपी मदत घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. साडेसात कोटी रुपयांचा प्रकल्प अडीच हजार कोटींवर गेला, हे कशामुळे झाले हे काय मी केले का? निळवंडे धरणात एकूण 8.32 टीएमसी पाणी आहे.
परंतु हे पाणी 68 हजार हेक्करला लाभक्षेत्राला पुरेल की नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. निळवंडे धरणाचे पाणी लाभ क्षेत्राला कमी पडू नये म्हणून सह्याद्रीच्या घाटमाथ्याच्या परिसरातून समुद्राकडे वाहून जाणारे पश्चिमेचे पाणी पूर्वेस वळवून स्वतंत्र ठिकाणी साठवून हे पाणी उत्तर नगर व नाशिक जिल्ह्यातील 182 गावांसाठी वापरण्यासाठी हा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी लाभ क्षेत्रातील सर्व आमदारांना सोबत घेऊन प्रसंगी पुन्हा एकदा दिल्ली व मुंबईला जलदिंडी काढून हा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे खा.लोखंडे यांनी सांगितले.
पश्चिमेकडून समुद्राकडे वाहून जाणारे पाणी अडविण्याचा कामासाठी जल अभ्यासक व तज्ञ व्यक्तींची शिखर समिती खा. सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात येणार असून राजकारण विरहित प्रामाणिकपणे काम करून ही समिती पाण्यासाठी संघर्ष करेल. शिखर समिती स्थापन करण्याचा ठराव या बैठकीत पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके यांनी केला.