उक्कलगावात बिबट्याचा धुमाकूळ, ग्रामस्थ धास्तावले

परिसरात पिंजरा लावण्याची मागणी
उक्कलगावात बिबट्याचा धुमाकूळ, ग्रामस्थ धास्तावले

श्रीरामपूर (प्रतिनिधी)

तालुक्यातील उक्कलगाव येथील उक्कलगाव-खंडाळा रोडवर असलेल्या महावितरणचे नंदकुमार रोहिदास थोरात यांच्या वस्तीवर गेल्या तीन ते चार दिवसांपासून बिबट्याचा वावर असून येथीलच भगवान रामदास थोरात यांच्या शेळीचे एक करडू बिबट्याने फस्त केल्याने उक्कलगाव थोरात वस्ती परिसरात रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण असून त्या भागात पिंजरा लावावा, अशी मागणी होत आहे.

बुधवारी रात्री उक्कलगाव येथील भगवान रामदास थोरात गोठ्यात झोपलेले असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. मात्र त्यांनी आरडाओरड केल्याने ते बालंबाल बचावले. त्यांना पायावर किरकोळ ओरखडे ओढले आहेत. येथे दाट लोकवस्ती असून भगवान व अंबादास थोरात यांच्या द्राक्ष बागा, नंदकुमार थोरात यांचे मकाचे क्षेत्र व लगतच पायथ्याला खळखळून वाहणारा ओढा असे बिबट्याच्या वास्तव्यास अनुकूल वातावरण असून येथील प्रत्येक शेतकऱ्याकडे जातीवंत कालवडी, गायी व शेळ्या असल्याने बिबट्या या परिसरात तळ ठोकून आहे. बिबटे संख्येने एकापेक्षा अधिक असल्याचे येथील प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.

तरी या भागात पिंजरा लावून या बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणी बापूसाहेब थोरात, आप्पासाहेब थोरात, अशोक थोरात, हरिभाऊ थोरात, सुदाम थोरात, बाबासाहेब थोरात, विजय थोरात, राजेंद्र थोरात, शरद एकनाथ थोरात, रामेश्वर थोरात, नितीन थोरात, साईश थोरात यांनी केली आहे. दरम्यान वनक्षेत्रपाल लांडे यांच्याशी संपर्क साधला असता ते आज याठिकाणी भेट देऊन पिंजरा देण्याची व्यवस्था करणार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com