दोन दरोड्याच्या गुन्ह्यांतील आरोपी बनला भाजी विक्रेता

सराईत गुन्हेगारी निर्मुलन आणि पुनर्वसन प्रकल्प अंतर्गत लोकशिक्षण प्रतिष्ठानचा उपक्रम
दोन दरोड्याच्या गुन्ह्यांतील आरोपी बनला भाजी विक्रेता

श्रीगोंदा l प्रतिनिधी

गुन्हेगारीचा शिक्का पडलेल्या व्यक्तीला परतीचे मार्ग नसतात असे म्हटले जाते पण हा समज श्रीगोंदा तालुक्यातील विशाल भोसले या युवकाने खोटा असल्याचे आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. कारण हा युवक आपल्यावरील गुन्हेगारीचा शिक्का पुसण्यासाठी झाले गेले सर्व विसरून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत आहे.

यावेळी बोलताना विशाल म्हणाला की, नातेवाईकांच्या चुकीमुळे मला ६ महीने २० दिवस तुरुंगात घालवित असताना मी बाहेर जाऊन समाजात काय तोंड दाखवू या विचाराने भांबावून गेलो होतो. तुरुंगातील मंडळी आता तु काही केलस किंवा नाही केलेस तरी पोलिसांचा ससेमीरा तुझ्या पाठीमागे लागणारच आहे. त्यामुळे तु आता खरंच असे गुन्हे कर असे सल्ले देत होते तर दुसरीकडे मला सोडविण्यासाठी कुटुंबीयांची होणारी वाताहतीच्या बातम्या कानावर येत असल्याने दररोज नरक यातनांनी व्यथीत होत होतं. तुरुंगातुन सुटका झाल्यानंतर काही दिवस मी व माझ्या कुटुंबीयांनी प्रचंड तणावात घालविले पण आज मला पुन्हा माणसात आल्यासारखे वाटत आहे.

लोकशिक्षण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद काळे म्हणाले की, पारधी समाज म्हणजे हा भारतातील जंगलात शिकारी करून जगणाऱ्या समाजापैकी एक आदिमतम आदिवासी समाज आहे. इंग्रजांनी भारतातील जंगलातून शिकारींवर मोठ्या प्रमाणावर बंदी घालून जंगलाबाहेर काढलेला हा समाज, भारताच्या ग्रामीण भागाने मुख्यप्रवाहात सामील करून न घेतल्यामुळे, उपजीविकेसाठी गुन्हेगारीच्या मार्गास लागला. इंग्रजांनी विशेष कायदा करून त्यांना जन्मजात गुन्हेगारी जमात हा ठसा मारला तो आजही कायम असल्याने काही युवकांना संशयावरून गुन्हेगार ठरविले जाते तर काहींचा प्रत्यक्ष संबंधही आढळुन येतो.

मात्र यामुळे कित्येकांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले आहेत व त्यांचे पुढील आयुष्य अंधारमय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन लोकशिक्षण प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेने सराईत गुन्हेगारी निर्मुलन आणि पुनर्वसन प्रकल्प हाती घेतला असून रस्ता भटकलेल्या चोरी, दरोडे, घरफोड्या असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या परंतु बदलाच्या भुमिकेत असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील ५० युवकांसोबत आणि त्यांच्या कुटुंबासोबत वर्षभर काम करुन त्यांचे समुपदेशन करुन असे गुन्हे करण्यापासून परावृत्त करुन शासनाचे विविध विभाग, एन.जी.ओ व इच्छुक दानशुर व्यक्तींच्या मदतीने त्यांचे सन्मानजक पुनर्वसन करणार असल्याचे काळे यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com