अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम निवडणुक आयोगाने शुक्रवारी जाहीर केला आहे. 23 डिसेंबरपासून अर्ज भरण्यास प्रारंभ होणार असून 18 जानेवारी 2021 ला मतमोजणी होणार असल्याचे आदेश म्हटले आहे. जिल्ह्यात निवडणूका होणार्या 767 ग्रामपंचायती आहेत.

राज्यात करोनामुळे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकींचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले होते. आता निवडणुक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे.

यामध्ये मुदत संपणार्या व नव्याने स्थापित होणार्या सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. 15 डिसेंबरला तहसीलदारांकडून निवडणुकीची नोटीस जाहीर केली जाणार आहे. तर 23 डिसेंबरला उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.

30 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. 31 डिसेंबरला दाखल अर्जाची छाननी होणार आहे. तर 4 जानेवारी 2021 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्ह देण्यात येणार आहे. तर 15 जानेवारी 2021 ला मतदान होणार असून 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी आदेशात म्हटले आहे. जिल्ह्यात 767 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.

कसा असेल निवडणूक कार्यक्रम?

15 डिसेंबर तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील

23 ते 30 डिसेंबर नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा कालावधी

31 डिसेंबर उमेदवारी मागे घेण्याची मुदत आणि अर्जांची छाननी

4 जानेवारी उमेदवारांची अंतिम यादी

15 जानेवारी मतदान

18 जानेवारी मतमोजणी

25 सप्टेंबरची मतदार यादी ग्राह्य धरणार

विधानसभा मतदारसंघाची 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 1 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 7 डिसेंबर 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिध्द केल्या जाणार आहेत, अशी माहितीही मदान यांनी दिली.

घोषणांना निर्बंध

निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये, निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील. या क्षेत्रातील मतदारांवर विपरित प्रभाव टाकणारी कोणतीही कृती/घोषणा मंत्री, खासदार, आमदार आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकार्यांना आचारसंहिता कालावधीत कुठेही करता येणार नाही.

प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारेच

- या निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारेच राबविण्यात येणार आहे.

- नगर जिल्ह्यात मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी असेल.

- 9 डिसेंबरच्या सुधारित कार्यक्रमानुसार अंतिम मतदार यादी 14 डिसेंबरला प्रसिध्द होणार

- करोनाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाच्या खबरदारीबाबत स्वतंत्रपणे मार्गदर्शक सूचना जारी होणार

निवडणूक होणार्या ग्रामपंचायती

अकोले 52, नेवासा 59, पाथर्डी 78, कर्जत 56, राहाता 25, श्रीरामपूर 27, कोपरगाव 29, राहुरी 46, संगमनेर 94, श्रीगोंदा 59, पारनेर 88, जामखेड 49, शेवगाव 48 आणि नगर 57 असे एकूण 767.