अकोलेत नव्याने 12 करोना बाधित
सार्वमत

अकोलेत नव्याने 12 करोना बाधित

Nilesh Jadhav

अकोले | प्रतिनिधी | Akole

अकोले शहरात करोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून काल रविवारी अकोले शहरात 10 रुग्ण तर उंचखडक बुद्रुक एक तर मवेशी (धामणवन) येथील एक 29 वर्षीय तरुण असे 12 रुग्ण करोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या आता 147 झाली आहे तर 60 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.

शहरातील सुभाष रोडवरील काल शनिवारी बाधित आलेल्या रुग्णांच्या कुटुंबातील 3 तर संगमनेर येथे वाहतूक शाखेत पोलीस म्हणून कार्यरत असणार्‍या व सध्या अकोलेत राहत असलेल्या बाधित पोलिसाच्या कुटुंबातील 6 जणांना करोना झाला. यासह शहरातील आंबेडकरनगर (जुनी स्टेट बँक रस्ता) व उंचखडक येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला.

अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेतील अहवालात शहरातील सुभाषरोड येथील 55 वर्षीय, 57 वर्षीय महिला व 04 वर्षीय बालक तर तहसील कचेरी जवळील कॉलनीत राहणार्‍या संगमनेर येथील पोलीस कर्मचार्‍यांच्या कुटुंबात 50 वर्षीय, 28 वर्षीय महिला, 33 वर्षीय पुरुष, 7 व 6 वर्षीय लहान मुले व 4 वर्षिय मुलगी तर तालुक्यातील उंचखडक येथील 60 वर्षीय पुरूषाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

तर खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात शहरातील आंबेडकर नगर, जुनी स्टेट बँक रस्त्यावर असलेल्या एका 35 वर्षीय मेडिकल व्यावसायिक व मवेशी (धामणवन ) येथील रहिवासी व चाकण पुणे येथे कंपनीत असलेला 29 वर्षिय तरुण यांना करोनाची बाधा झाली आहे.

तालुक्यात रुग्णांची एकूण संंख्या 147 झाली आहे त्यापैकी 86 जण करोनामुक्त झाले. आतापर्यंत तीन जण मयत झाले असून सध्या 60 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com