तरुणांचे धाडस...श्रीगोंद्यात पकडला स्वस्त धान्य दुकानातील माल !

88 गोणी गहू-तांदूळांचा समावेश : गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
तरुणांचे धाडस...श्रीगोंद्यात पकडला स्वस्त धान्य दुकानातील माल !

श्रीगोंदा | प्रतिनिधी | Shrigonda

श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे आणि पोलीसवाडी ग्रामस्थांना अनेक दिवसांपासून रेशनवर गहू, तांदूळ मिळत नसल्याच्या तक्रारी असताना संबंधित गावातील तरुणांनी पाळत ठेवून धाडस दाखवत (दि.16) रात्री एक टेम्पो पकडला यात 44 गोण्या तांदूळ आणि 44 गोण्या गहू असा 71 हजार किंमतीचा माल आढळून आला.

हे धान्य गावातील महिला बचत गट आणि दुसरे एका रेशन दुकानातील मात्र, एकाच कुटुंबातील मालकीच्या दुकानातील असून प्राधान्य धारकांना द्यावयाचा हा गहू आणि तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेताना सापडला आहे. याप्रकरणी उशिरापर्यंत बेलवंडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे आणि पोलीसवाडी ही गावे शेजारी असून या दोन्ही गावांतील रास्तभाव दुकान हे एकाच कुटुंबातील सदस्य चालवतो. त्याचे एक दुकान शिव मल्हार महिला बचतगट चालक संगीता रावसाहेब पवार हे चालवतात तर दुसरे दुकान निलेश पवार हे चालवत असून गावातील लाभार्थी हे धान्य मिळत नसल्याने तक्रार करत असताना गावातील तरुणांनी हा माल कुठे जातो यासाठी पाळत ठेवली होती.

16 ऑगस्टला रात्री गावातून एक टेम्पो भरून धान्य जात असल्याची खबर तरूणांच्या हाती आली. तरुणांनी धाडसाने हा धान्याने भरलेला टेम्पो पडकला हे धान्य काळ्या बाजारात घेऊन जाणारा महावीर गांधी हा पारगाव सुद्रीक येथील तरुणाला जाब विचारत गावकर्‍यांनी चोप दिला. यानंतर गांधी पोपटासारखा बोलू लागला.

निलेश पवार आणि संगिता रावसाहेब पवार हे चालवत असलेल्या शिव मल्हार बचत गटाचे रास्त भाव दुकानातील काळ्या बाजारात जाणारा 44 गोण्या गहू आणि 44 गोण्या तांदूळ टेम्पोसह ग्रामस्थांनी बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात दिला.

यानंतर प्रभारी पुरवठा निरीक्षक दत्तात्रय साळुंके यांनी दोन्ही दुकानाचे पंचनामे केले. तहसिलदार चारुलता पवार, नायब तहसीलदार योगिता ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. मंडलाधिकारी आर. डी. टेमक, तलाठी एस. बी. भामरे, जी.एम झाडे यांनी पंचनामा केला. उशिरा पुरवठा निरीक्षक साळुंके यांच्या फिर्यादी वरून रास्त भाव दुकानदार आणि महावीर गांधी या तिघाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पुरवठा विभागाचा सावळा गोंधळ

श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावात रास्त भाव दुकानात धान्य भेटत नसल्याच्या तक्रार केल्या जातात. मात्र, या दुकानदारांना पाठीशी घातले जात असल्याने कारवाई होत नसल्याने तालुक्यात काळ्याबाजाराचे प्रकार वाढले आहे. पुरवठा विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com