देशातील सर्वात उंच भगव्या ‘स्वराज्य ध्वज’च्या पूजन यात्रेस आरंभ

6 राज्ये, 74 ठिकाणे, 37 दिवस, 12 हजार किलोमीटरचा करणार प्रवास
देशातील सर्वात उंच भगव्या ‘स्वराज्य ध्वज’च्या पूजन यात्रेस आरंभ

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

देशातील सर्वात उंच भगव्या ‘स्वराज्य ध्वजा’च्या पूजन यात्रेस कर्जत येथून गुरूवारी (दि.9) रोजी मोठ्या दिमाखादार सोहळ्याद्वारे, हजारोंच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. यावेळी आबालवृद्धांनी यात्रेला शुभेच्छा दिल्या. येथील ग्रामदैवत सद्गुरू गोदड महाराज मंदिर याठिकाणी पूजन करून यात्रेस शुभारंभ करण्यात आला.

दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर 15 ऑक्टोबरला या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना खर्ड्याच्या भुईकोट किल्ल्यावर होणार आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रासह देशातील प्रमुख संतपीठे, शौर्यपीठे आणि धार्मिक पीठे तसेच श्रीराम मंदिर (अयोध्या), मथुरा, बोधगया (बिहार), केदारनाथ (उत्तराखंड), आग्रा किल्ला (उत्तर प्रदेश), अजमेर शरीफ दर्गा (राजस्थान), महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड (तिसरे), बडोदा संस्थानचे अधिपती, गुजरात अशा 74 ठिकाणी नेऊन या ध्वजाचे पूजन होणार आहे. त्यासाठी 6 राज्यांमधून 12 हजार किलोमीटर असा सलग 37 दिवस या ध्वजाचा प्रवास होणार आहे. या कार्यक्रमाचा प्रारंभ काल सकाळी 8 वाजता कर्जत येथील संतश्री गोदड महाराज यांच्या मंदिरात पूजेने झाला. त्यानंतर दुपारी 3 वाजता जुन्नर येथे शिवनेरी किल्ल्यावर नेऊन पूजा करण्यात आली.

यात्रा शुभारंभप्रसंगी कर्जत शहरातील सर्व रस्ते सडा रांगोळ्या कमानी यांनी सजवण्यात आले होते. यात्रेला शुभेच्छा देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा हजारो नागरिक जमले होते. या शोभायात्रेमध्ये शिवकालीन पोषाख केलेली शेकडो महिला आणि पुरुष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या. मर्दानी खेळ, पारंपारिक नृत्य, हलगी, ढोल, ताशा गजनृत्य, टाळ-मृदंगाचा निनाद व सर्वत्र होत असलेली पुष्पवृष्टी, सहभागी झालेले सर्व जाती धर्माचे आबालवृद्ध नागरिक आणि त्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह पाहत, याच देही याची डोळा हे सर्व सुंदर आणि मनोरम दृश्य प्रत्येक जण आपल्या मनात आणि हृदयात साठवून ठेवत होता.

यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले, निजामाविरुद्ध हिंदवी स्वराज्याचा विराट विजय झाला, ती पावन भूमी म्हणजे नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड येथील शिवपट्टण म्हणजेच खर्ड्याच्या भूईकोट किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून या परिसराला नवी ओळख देण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार किल्ल्याच्या आवारात भव्य ध्वजस्तंभ साकार होत असून त्यावर प्रेरणा, ऊर्जा देणारा 74 मीटर उंचीचा भव्य-दिव्य असा भगवा स्वराज्य ध्वज फडकवण्यात येणार आहे.

असा आहे ध्वज !

हिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 6 जून 1674 मध्ये झालेल्या राज्याभिषेकाचे स्मरण म्हणून या ध्वजाची उंची 74 मीटर ठेवण्यात आली आहे. या ध्वजाचा आकार 9664 फूट असून वजन 90 किलो आहे. हा राज्यातीलच नाही तर जगातील सर्वांत उंच भगवा ध्वज असणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com