अहमदनगर|Ahmedagar -

आरोपीला अत्याचाराच्या गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी 30 हजार रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी जामखेड

पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सज्जन किसन नार्हेडा (वय- 36) याला लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे. नार्हेडा याच्यासाठी 30 हजार रूपयांची लाच स्वीकारताना खाजगी इसम तुकाराम रामराव ढोले (वय- 38 रा. मोरे वस्ती, जामखेड) याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नगर पथकाने मंगळवारी ही कारवाई केली.

तक्रारदार यांच्या भावावर जामखेड पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तक्रारदार यांच्या भावाला पोलिसांनी अटक केली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी व आरोपीला भादवि 169 अन्वये गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे एक लाख रूपयांची मागणी करण्यात आली होती. तक्रारदार यांनी नगर लाचलुचपत विभागाकडे याबाबत तक्रार केली. मंगळवारी लाच मागणी पडताळणीत पोलीस उपनिरीक्षक नार्हेडा यांनी तुकाराम ढोले याच्या उपस्थितीत तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष 50 हजार रूपयांची मागणी केली. तडजोडीअंती 30 हजार रूपये तुकाराम ढोले याच्याकडे जामखेड शहरातील कृष्णा हॉटेल येथे देण्यास सांगितले. त्याप्रमाणे तुकाराम ढोले याने उपनिरीक्षक नार्हेडा यांच्यासाठी तक्रारदार यांच्याकडून कृष्णा हॉटेल येथे 30 हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. यानंतर उपनिरीक्षक नार्हेडा यांना पथकाने तब्यात घेतले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर अधीक्षक निलेश सोनवणे, उपअधीक्षक दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाम पवरे यांच्या पथकाने केली.