अहमदनगर (प्रतिनिधी) -

मार्च महिन्यांत आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. तेव्हा करोनाचा संसर्ग सुरू झाला होता. याचे संक्रमण रोखण्यासाठी केंद्रशासनाने टाळेबंदी घोषित केली होती.

करोना बाधित रुग्णाजवळ जाण्यास नातेवाईक देखील घाबरत होते. आशा परिस्थितीत आम्ही सर्व अधिकारी, विभाग प्रमुख व कर्मचारी एकजुटीने परिस्थितीला दृढ निश्चयाने सामोरे गेलो. स्वच्छता, पाणी पुरवठा, दिवाबत्ती आदी नित्य व अत्यावश्यक सेवा अखंडपणे सुरू ठेवली. करोना संकट काळातील सेवेचा अनुभव सदैव स्मरणात राहील, असे प्रतिपादन मावळते आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी केले. आयुक्त मायकलवार आज (गुरूवारी) निवृत्त होत आहेत. यानिमित्ताने त्यांनी करोना काळात केलेल्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले.

आयुक्त मायकलवार म्हणाले, करोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने कठोर पाऊले उचलत टाळेबंदी घोषीत केली होती. दररोज वेगवेगळे निर्देश जारी केले जात होते. त्या सर्व निर्देशांची आम्ही सर्वांच्या सहकार्याने प्रभावीपणे अंमलबजावणी केली. करोना संसर्ग रोखण्यात व रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन त्यात नगरकरांची साथ लाभल्याने यश मिळवले. याच दरम्यान, उपजीविका व रोजगारासाठी मोठ्या शहरांत गेलेल्या नागरिकांनी आपापल्या गावी परतीचा प्रवास सुरू केला. अनेक गोरगरिबांनी अक्षरशः पायपीट सुरू केली. अनेकांचे रोजगार बुडाल्याने या सर्वांची व्यवस्था महापालिकेने केली. दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने किचन सुरू करून दररोज सुमारे एक हजार नागरिकांच्या भोजनाची सुविधा सलग पाच महिने उपलब्ध करून दिली, यात मोठे समाधान मिळाले.

करोनाबाधित रुग्णांवर उपचारांसाठी कोव्हिड सेंटर सुरू करून त्यांना दिलासा देण्याचे काम केले. अशा कठीण काळात कर्तव्य बजावत असताना कुटुंबात अप्रिय घटना घडली तरीही कधी रजेवर गेलो नाही. नागरिकांना प्राधान्याने सेवा देण्याचा प्रयत्न केला. याचबरोबर आता हळूहळू टाळेबंदी शिथील झाल्यानंतर शहरातील महत्त्वाच्या योजनांच्या कामांना गती देण्याचे काम केले. अमृत पाणी योजना आता अंतिम टप्प्यात असून ती लवकरच पूर्ण होऊन शहराला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.